कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘हा जो प्रकार…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या अदांनी तरुणाईला घायाळ करणारी गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच तिचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमास्थळी कपडे बदल असताना अज्ञाताने तिचा व्हिडीओ चित्रित केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजातील सर्वच स्तरातून त्याचा निषेध करण्यात आला होता. अशा लोकांना वेळीच शासन करण्याची मागणी व्हायला हवी असा सूर आळवला गेला. आता या व्हिडीओ प्रकरणी गौतमी पाटील पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलली आहे.

नाशिक येथे यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटील म्हणाली, मला नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मिळत आले आहे. अजून जास्त प्रेम मिळतेय त्यामुळे आणखी छान वाटतेय. हा जो प्रकार घडलाय त्यावर माझी बोलण्याची मनस्थिती नाहीय, तरीही मी तुमच्यासमोर आली आहे. लोक माझ्यासोबत आहेत. या गोष्टीचा खूप अभिमान आहे. आपल्याला लोकांची साथ आहे, यामुळे खूप छान वाटतेय, असेही ती म्हणाली.

कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याबाबत विचारले असता गौतमी पाटील म्हणाली, त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. मी यावर काहीही बोलू शकत नाही. माझी पोलिसांकडे काहीही मागणी नाही. माझे पोलिसांशी जे बोलणे चालू आहे, ते चालू आहे. मी त्या बाबतीत काहीही बोलू शकत नाही.

दरम्यान, गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी याची दखल घेतली. संबंधित व्हिडीओ शूट करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, असा आदेश रुपाली चाकणकरांनी दिला.

गौतमी पाटीलची तिच्या डान्समुळे सगळ्या महाराष्ट्रात क्रेझ आहे. पण काही लावणी कलावंत आणि संघटनांकडून तिच्यावर अश्लीलतेचे आरोप होत आहेत. गौतमी लावणीसोबत अश्लील हावभाव करते त्यामुळे तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.