
गवळी समाज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करी रोडच्या गोदरेज मैदानात झालेल्या गवळी प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्हापूर सुपरकिंग्जने खेड खिलाडीचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. गवळी समाजातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक निधी उपलब्ध देण्यासाठी समाजाने गवळी प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. या लीगला पुरस्कर्त्यांचा चांगलाच प्रतिसाद लाभत असल्यामुळे या लीगमध्ये महाराष्ट्रातील 16 गवळी संघांचा सहभाग लाभला होता. कोल्हापूर सुपरकिंग्ज आणि खेड खिलाडी यांच्यात झालेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरने दहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार विश्वास दळवीने पटकावला तर पवन केळस्कर उत्कृष्ट फलंदाज आणि सुशांत हाप्पेने उत्कृष्ट गोलंदाजाचा मान मिळवला. संस्थेचे अध्यक्ष नीलेश गवळी यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाला शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, सचिन अहिर, नगरसेविका गीता गवळी, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर, टाटा रुग्णालयाचे युनिट अध्यक्ष तुकाराम गवळी यांची उपस्थिती लाभली.


























































