
सामना प्रतिनिधी । औसा
औसा तालुक्यातील रब्बी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात रोगांचा मारा झाला असून आळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने हरभरा पिक धोक्यात आले आहे.
यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी पेरताना ज्वारी आणि गव्हाची लागवड कमी प्रमाणात झाली. रब्बीच्या ५० टक्के पेरणी क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या हरभरा पिकांची पेरणी केली आहे. हरभरा पिकांवर १८ व १९ नोव्हेंबर पासून पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात आळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्गाला पुन्हा संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. एकुण रब्बीच्या पेरणी क्षेत्रापैकी ५० टक्क्यापेक्षा अधिक हरभरा पिकाची लागवड झाली असून आळ्यामुळे हरभरा पिकांची नासाडी होत असून पिकांची वाढही खुंटली आहे.
१८ व १९ नोव्हेंबर रोजीच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी पिकावर पडलेल्या आळ्यामुळे हरभरा हिरवा दिसत असला तरी अद्याप हरभऱ्याला फुलोरा नसल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. याचा परिणाम म्हणून यावर्षी हरभरा पिकाच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. ओढे, नद्या व तलाव कोरडे पडले असून विहिरीतील पाणी पातळीही खोल गेली असून असेल तेवढ्या विहिरी व बोअरवेलमधील पाण्यावर रब्बी पिकांची जोपासणा करण्याचा बळीराजा प्रयत्न करीत आहे.






























































