
सामना प्रतिनिधी । गेवराई
महसूल विभागाने अवैध वाळू चोरीप्रकरणी पकडलेली गाडी सोडून देण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गेवराई येथील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. महसूल विभागाने 27 मे रोजी अवैध वाळू चोरी प्रकरणी हायवा गाडी पकडली होती. ही गाडी सोडून देण्यासाठी तहसील कार्यालयातील लिपीक सुबोध विजय कुमार जैन यांनी तक्रारदारांकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. या प्रकरणाची शहानिशा करुन हायवा टिप्पर सोडवण्यासाठी 70 हजार रुपयांमध्ये तडजोड करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी गेवराई तहसील कार्यालयाच्या बाहेर सापळा रचला. त्यावेळी तक्रार दाराकडून 70 हजार रुपये स्वीकारताना सुबोध जैनला पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील व पोलिस पथकाने केली आहे.


























































