
घाटकोपर पोलिसांनी हरवलेल्या व चोरीच्या मोबाईलचा कसून शोध घेत तब्बल 250 मोबाईल परत मिळवले आणि मुळ मालकांना परत करण्याची कामगिरी बजावली. घाटकोपर पोलिसांकडे मोबाईल चोरीचे व हरविल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत वरिष्ठ निरीक्षक देशमुख व पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक भारती, नीलेश पवार, अमोल सूर्यवंशी, अजय अहिरे, गव्हाणे या पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे कसून शोध घेतला. मग मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन तब्बल 250 मोबाईल तर मिळवले. त्यानंतर गेलेला मोबाईल परत मिळणार नाही अशा मानसिकतेत असलेल्या नागरिकांना त्यांचे मोबाईल आज परत करण्यात आले. तब्बल 40 लाख पाच हजार किमतीचे मोबाईल पोलिसांकडून परत करून नागरिकांना सुखद धक्का देण्यात आला.



























































