घावनळे येथे मोरी खचल्याने वाहतूक बंद; आमदार वैभव नाईक यांनी घेतली दखल

खुटवाळवाडी रामेश्वर मंदीर रस्त्यावरील मोरीचा काही भाग दोन दिवसापूसन ढासळत होता. मुसळधार पावसामुळे या रस्त्याची मोरी खचून गेल्याने वाहतुक बंद झाली होती. याची दखल आमदार वैभव नाईक यांनी घेत शुक्रवारी तातडीने शिवसेना पदाधिकाऱ्यांमार्फत पाहणी केली. तसेच हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून होण्यासाठी प्रयत्न करु. तसेच या मोरी बांधकामासाठी निधी देऊ, अशी ग्वाही नाईक यांनी यावेळी दिली.

कुडाळ तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने या मोरीचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली. याबाबत घावनळे उपसरपंच दिनेश वारंग, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य मिलींद नाईक यांनी याबाबत आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधताच त्यांनी तात्काळ दखल घेतली. नाईक यांनी लागलीच कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी यांना घावनळे येथे पाठवुन त्या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. उपसरपंच दीनेश वारंग यांनी नाईक यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला.

मोरी बांधकाम तातडीने व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्पुरता रस्ता सुरु करुन वाहतुक सुरु होण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक यांनी आपण हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून होण्यासाठी प्रयत्न करु, तसेच या मोरी बांधकामासाठी निधी देऊ अशी ग्वाही दिली.

आपली प्रतिक्रिया द्या