प्रेमविवाह केला म्हणून जोडप्याला मारझोड, जमिनीवर थुंकून चाटायला लावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका जोडप्याने प्रेमविवाह केला म्हणून त्यांना गावकऱ्यांनी भलतीच शिक्षा केली. जोडप्याने त्यांच्या विवाहाचा व्हिडियोसुद्धा सोशल मिडियाद्वारे शेअर केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते शिक्षा केलेल्या गावकऱ्यांचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील बहरियाबाद पोलीस स्थानक परिसरातील भाला बुजुर्ग गावात ही घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या एका प्रेमी युगुलाने मंदिरात जाऊन लग्न केले. त्यांनी लग्न केल्याची बातमी बृजेश या गावप्रमुखाला मिळताच त्याने या दोघांना एक खोलीत बंदिस्त करून ठेवले. तेथे त्याने दोघांना बेदम मारहाण केली. शिवीगाळ करून गावप्रमुख प्रियकर-प्रेयसीला मारहाण करत होता. एवढेच नाही तर गावप्रमुखाने या जोडप्याला जमिनीवर थुंकायला सांगून त्यांची थुंकी चाटायला लावली. या घटनेचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये मारहाण करणारी व्यक्ती भाला बुजुर्ग गावचा प्रमुख ब्रिजेश यादव असल्याचे सांगण्यात येत आहे. तो एका मुलीला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. इतकंच नाही तर मुलीला मारहाण करून जमिनीवर थुंकून चाटायला लावलं जात आहे. या व्हिडियोमध्ये तरुणीच्या प्रियकरालाही थुंकी चाटायला लावले जात आहे. सध्या हे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधिकारी ओमवीर सिंह यांनी तपास आणि कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गावप्रमुख बृजेश यादव याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.