घोटणचा मल्लिकार्जुन

471

>> आशुतोष बापट

नगर जिह्यातील शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटण येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवणारे एक सुंदर ठिकाण. शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे असलेले स्थापत्य आणि शिवाय त्याच्याशी निगडित असलेली सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.

नगर जिल्हा हा प्राचीन ऐतिहासिक अवशेष आणि धार्मिक स्थळांनी नटलेला असूनही इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहिलेला दिसतो. संभाजीनगर आणि बीड हे मराठवाडय़ातले दोन जिल्हे अगदी बिलगून असल्यामुळे नगर जिह्यावर बऱयाच ठिकाणी मराठवाडय़ाचा प्रभावसुद्धा जाणवतो

नगर जिह्याचा शेवगाव तालुका हा तर प्राचीन पैठणला खेटूनच वसलेला आहे. सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणच्या परिसरात आजही तत्कालीन राजवटीचे अवशेष सापडतात. पुढे इ.स.च्या 10 ते 14 व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणाखुणा आजही या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. शेवगाव-पैठण रस्त्यावर वसलेल्या घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवणारे एक सुंदर ठिकाण. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे असलेले स्थापत्य आणि शिवाय त्याच्याशी निगडित असलेली सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.

घोटण नाव कसे पडले हे सांगणारी कथा आपल्याला थेट महाभारतात घेऊन जाते. कौरव आणि जरासंधाने विराट राजाच्या गाई पळवल्या. त्या गाई भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना याठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला `गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला `मल्लिकार्जुन’.

यादव कालीन स्थापत्याच्या खुणा सांगणारे सुंदर असे देवालय इथे आहे. चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. मंदिर प्राकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात. मुख्य मंदिर हे 60 फूट लांबी-रुंदीचे आहे. मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात बांधलेले कळते. मंदिराच्या सभामंडपात 16 खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्ल-युद्ध तसेच काही मिथुन शिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेटस असतात. त्यावर कधी दोन तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी यक्षाची मूर्ती कोरलेली असते. मल्लिकार्जुन मंदिरात 16 पैकी जे 4 खांब मधोमध आहेत त्यावर चक्क 5 यक्ष कोरलेले आहेत. एका बाजूला तीन आणि इतर दोन बाजूंवर एकेक.

इथे असलेला गाभारा हा अगदी आगळावेगळा असा आहे. साधारणत: शिवमंदिराचा गाभारा हा 3-4 फूट खोल असून त्यात शिवपिंडी असते. इथे चक्क 15 फूट खोल गाभारा असून तो दोन टप्प्यांत विभागला आहे. 5 पायऱया उतरून गेले की आपण एका टप्प्यावर येतो. इथे परत दोन बाजूला सपाट जागा असून एका बाजूला दरवाजा तर दुसरीकडे झरोका आहे. इथे पुन्हा 4 खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. इथून अजून 10 पायऱया उतरून खाली गेले की मग शिवपिंड दिसते. या पायऱयांवर कोणा भक्तांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. शिवपिंडीच्या जवळच एक पाण्याचा झरा असून तिथे कायम पाणी असते. अशा शिवलिंगांना `पाताळलिंग’ असे म्हटले जाते. अंबरनाथ, त्र्यंबकेश्वर याठिकाणी असे खोलात असलेले शिवलिंग बघता येते.

पहिल्या टप्प्यावर जे दार आहे ते बाहेरील बाजूनी द्वारशाखांनी नटवलेले आहे. कदाचित इथे गाभारा आणि त्यात मूर्ती असेल का, असे वाटते. मुख्य गाभाऱयाच्या दरवाजाच्या खाली दोन्ही बाजूंना पाठीवर मुंगुसाची पिशवी घेतलेल्या कुबेराच्या सुरेख मूर्ती असून दरवाजा हा अत्यंत देखण्या अशा द्वारशाखांनी सजवलेला आहे.

इथले अजून वेगळेपण म्हणजे दरवाजाच्या डोक्यावर मधोमध असलेले ललाटबिंब. इथे शक्यतो गणपती, अथवा शंकराची प्रतिमा बघायला मिळते. पण घोटणच्या या मंदिरावर हातात धनुष्य घेतलेल्या शिवाची आलीढासनातील मूर्ती आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी विद्याधर आपल्या हातात पुष्पमाळा घेऊन शिवाला वंदन करताना शिल्पित केलेले आहेत. किरातार्जुन प्रसंग आणि त्रिपुरासुराचा वध अशा दोन प्रसंगीच शिवाच्या हातात धनुष्य दिसते. इतके आगळेवेगळे ललाटबिंब अन्यत्र कुठे दिसत नाही. धनुष्यधारी शिव, आणि खांबांवर असलेली युद्धाचे प्रसंग असलेली शिल्पे यावरून हे कुठले शक्तीस्थळ असावे का या शंकेला वाव आहे. सभागृहात एक गद्धेगाळ आणि त्यावर देवनागरी लिपीत लिहिलेला काहीसा झिजलेला शिलालेख दिसतो. याच गावात सध्या बरीचशी बुजलेली सासू-सुनेची बारव आणि प्राचीन जटाशंकर मंदिर बघता येतात. पैठणपासून जेमतेम 15 कि.मी. वर असणारे हे घोटणचे मल्लिकार्जुन मंदिर आणि त्याचे आगळेवेगळे स्थापत्य आवर्जून पाहावे असे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या