
‘एकनाथ खडसे यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. कोअर ग्रुपच्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे खडसे यांचा आरोप चुकीचा आहे. खडसे यांचे तिकीट केंद्रीय समितीने कापले’, असे स्पष्टीकरण देत गिरीश महाजन यांनी ‘हँडस्अप’ केले आहे. यापूर्वी मला राजकारणातून संपवण्याचा जाणीवपूर्वक डाव असून, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू नये यासाठी भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये भूमिका मांडली होती असा खळबळजनक आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपांवर महाजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, ‘गैरसमज किंवा चुकीची माहिती एकनाथ खडसे यांना दिली गेली आहे. असा कुठलाही विरोध बैठकीमध्ये झाला नाही, तसेच यावर चर्चा देखील झाली नाही. चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, पुरोहित यासह अनेक वरिष्ठांचे तिकीट कापले गेले. एकनाथ खडसे यांच्या घरात रोहिणी खडसे यांना तिकीट मिळाले, मात्र इतर नेत्यांच्या तर कुटुंबीयांनाही तिकीट मिळाले नाही. तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला चुकीच्या माहितीच्या आधारे हा आरोप केला गेला आहे’, असेही महाजन यावेळी म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. चौकशी अंती सर्व सोक्षमोक्ष लागेल असेही गिरीश महाजन म्हणाले. तसेच व्यवस्थिती माहिती घेऊन आरोप करायला हवेत. कोअर ग्रुपच्या बैठकीतील कोणी याबाबत बोलले तर त्याच आम्ही जबाबदार आहोत, मात्र खडसे यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असेही महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्याशी बोलणार आहे, असेही ते म्हणाले.
काय होता आरोप?
विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे एकामागोमाग एक स्वपक्षावर हल्ला चढवत आहेत. बुधवारी त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत मला राजकारणातून संपवण्याचा जाणीवपूर्वक डाव केला गेला असल्याचा गंभीर आरोप केला. खडसेंनी पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी सुरू केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली.
सविस्तर बातमी येथे वाचा –
फडणवीस, महाजनांनीच तिकीट कापल्याचा खडसेंचा आरोप, भाजपच्या गोटात पुन्हा हादरे





























































