कोलंबियामध्ये एका 10 वर्षीय मुलीचा नेग्लेरिया फॅलेरी नावाच्या मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.10 वर्षीय स्टेफानिया विलमिझार गोन्झालेझ आपल्या कुटुंबीयांसह सुट्टीच्या दिवसांध्ये सांता मार्ता या शहरामध्ये गेली होती. सांता मार्ता शहरातील एका हॉटेलमध्ये ते काही दिवस राहिले होते. या हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद स्टेफानियाने घेतला होता. पोहल्यानंतर तिला कानदुखी झाली होती मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते. घरी आल्यावर वेदना कमी झाल्यामुळे घरच्यांनीही तिला डॉक्टरांकडे नेले नाही.
काही दिवसांनी स्टेफानियाला सुरुवातीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला, ज्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. अवघ्या दोनच आठवड्यात तिची प्रकृत्ती कमालीची खालवली. तिला अंथरुणावरुन उठणे सुध्दा कठीण वाटू लागले होते. यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालायत दाखल केल्यानंतर तीनच आठवड्यात तिला मृत्यूने गाठले. सुरुवातीला मृत्यूचे कारण डॉक्टरांना सापडत नव्हते. पण, बारकाईने तपासणी केल्यानंतर स्टेफानियाचा मृत्यू हा नेग्लेरिया फॅलेरी नावाच्या मेंदू कुरतडणाऱ्या अमिबामुळे झाला असल्याचे निष्पन्न झाले.
डॉक्टरांनी सांगितले की, हा एक दुर्मिळ आजार असून या आजारात मृत्यूचा धोका 95 टक्क्यांनी वाढतो कारण हा अमिबा थेट मेंदूच्या ऊतींचे नुकसान करत असतो. केरळमध्ये याच वर्षी जुलै महिन्यात मेंदू करुतडणाऱ्या अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
नेग्लेरिया फॅलेरीचा संसर्ग कसा होतो?
हा एक जलजन्य अमीबा असून नाकावाटे माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. शरीरात प्रवेश केल्यावर मेंदूमध्ये प्रवेश करतो आणि मेंदूच्या नसांचं नुकसान करतो. या संसर्गाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा मृत्यूदर 97 टक्क्यांहून अधिक आहे.
हा अमिबा कुठे आढळतो?
हा अमिबा पाणवठे, नद्या, दूषित पाणी, पुरेसे क्लोरीन नसलेले स्विमिंग पूल, वॉटर पार्कमध्ये नेग्लेरिया फॅलेरी आढळतो.