
देशातील जनतेच्या पुरुषसत्ताक मानसिकतेत हळूहळू बदल होत आहे. मुलगाच हवा या मानसिकतेतून लोक बाहेर पडत असल्याचे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या (एनएफएचएस) अहवालातून स्पष्ट होत आहे. देशात पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त झाली आहे. 1000 पुरुषांच्या संख्येमागे 1020 महिला असल्याचे समोर आले आहे. प्रजनन दरामध्येही 2.2 वरून 2 पर्यंत घट झाली आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्ष
- राष्ट्रीय प्रजनन दर (प्रति महिला मुलांची संख्या) यापूर्वी 2.2 होता. ‘एनएफएचएस’च्या पाचव्या सर्वेक्षणात हा दर 2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. राज्यांचा विचार केल्यास उत्तरप्रदेशात प्रजनन दर सर्वाधिक 2.4 आहे. केंद्रशासित चंदिगडमध्ये सर्वांत कमी 1.4 आहे. गर्भनिरोधक प्रसार दर (सीपीआर) 54 टक्क्यांवरून 67 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
- हॉस्पिटलमध्ये जन्माचे प्रमाण 79 टक्क्यांवरून 89 टक्के वाढले आहे. पुदूच्चेरी आणि तामिळनाडूत हे प्रमाण 100 टक्के आहे.
- 12 ते 23 महिन्यांच्या बालकांचे पूर्ण लसीकरणाचे प्रमाणही 62 टक्क्यांवरून 76 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
43.3 टक्के महिलांच्या नावावर मालमत्ता
देशातील 43.3 टक्के महिलांच्या नावावर काही ना काही मालमत्ता आहे. 78.6 टक्के महिलांचे बँकेत स्वतःचे खाते आहेत.




























































