तरुणीचा व्हिडीओ केला व्हायरल; एकाला अटक

किरकोळ वादानंतर तरुणीचा बदला घेण्यासाठी तिचा नकोसा व्हिडीओ व्हायरल करणाऱया सुनील महंतो याला जुहू पोलिसांनी अटक केली.

तक्रारदार तरुणी जुहू येथे काम करते. काही महिन्यांपूर्वी तिची सुनीलसोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काही दिवसांपूर्वी सुनील आणि तरुणीचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचा राग सुनीलने डोक्यात ठेवला. तरुणीला धडा शिकवण्यासाठी त्याने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्यावर त्याने तरुणीचा नकोसा व्हिडीओ व्हायरल केला. तो व्हिडीओ पाहून तरुणीला धक्काच बसला. घडल्या प्रकरणी तिने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. सहाय्यक आयुक्त महेश मुगुटराव यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुनील पुमार जाधव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक खाडे, उपनिरीक्षक अनुराग दीक्षित, तासगावकर, मांडेकर, कोकिटकर आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी घाटकोपर येथून सुनीलला ताब्यात घेतले. सुनील घाटकोपर येथे एका ठिकाणी केअरटेकर म्हणून काम करत होता. पोलिसांनी सुनीलकडून मोबाईल जप्त केला आहे.