कविता मनामनातली – विस्फोटक अनुभूती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>गीतेश शिंदे

चंद्रपुरात नोंदवले गेले उच्चांकी तापमान, चंद्रपूर ठरले सर्वात उष्ण शहर…अशा मथळ्यांच्या बातम्या दरवर्षी उन्हाळ्यात वाचनात येतात, पण या तापमानवाढीच्या मुळाशी प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड, औष्णिक ऊर्जा केंद्र, समृद्धीच्या नावाखाली होणारे ड्रीम प्रोजेक्ट्स, खाण व्यावसायिकांचा हव्यास आहे हे मात्र सोयिस्कररीत्या आपण विसरतो, परंतु निसर्गातील हे सारे बदल तटस्थपणे टिपण्याचे आणि आपल्या कवितांतून नोंदवण्याचे काम केले आहे ते चंद्रपूर येथील कवी किशोर कवठे यांनी. ‘पसरत गेलेली शाई’, ‘गावसुक्त’ यापाठोपाठ आलेल्या कवितासंग्रहांनंतर मार्च 2018 मध्ये सप्तरंग प्रकाशनकडून आलेला ‘दगान’ हा किशोर कवठेंचा तिसरा संग्रह. खाणीत सुरुंग लावून केलेल्या स्फोटाला ‘दगान’ म्हटले जाते.

कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिह्यात ‘कोल माईन’ हा शब्द अधिक रूढ झाला असून किशोर कवठेंनी ‘दगान’ संग्रहाच्या निमित्ताने आजवर अस्पर्शित विषयावर लिहून काव्यरसिकांना अनुभव संपन्नतेच्या नव्या खाणीत उतरवले आहे. कोळसा खाणीत काम करणाऱयांचा खाचखळग्यांनी भरलेला प्रवास आपल्या कवितेच्या माध्यमातून उजागर केला आहे. संग्रहाच्या सुरुवातीला कोल माईन आणि त्यात कष्ट करणाऱया कामगार वर्गाची, त्यांच्या खालावलेल्या जीवनस्तराची, भौगोलिकतेची व्यथा मांडू पाहणारी कविता पुढे शेती-माती आणि गाव या विषयांचा परिघही कवेत घेते.

बोगदा ‘आ’ वासून पहुडलेला 

जिवंत माणसांची वाट बघत…

‘रहीमकाका आणि बकरी’ या संग्रहातील पहिल्या कवितेतून खाणीतील कोळसा संपूर्ण उकरून झाल्यावर भ्रष्ट व्यवस्थेने निर्माण केलेले हे मृत्यूचे सापळे आणि त्यात दुर्घटनाग्रस्त होणाऱया लोकांवर कवी प्रकाश टाकतो. ‘बोगद्याच्या तोंडाला सुटले अहंकाराचे पाणी’ किंवा ‘बदफैली पाणी’ या प्रतिमा माणसाच्या मनोवृत्तीचे दर्शन घडवतात.

हतबलतेचा चेहरा घेऊन  रोज उभा राहतो

काळ्या रंगाने माखलेला 

‘फस्टशिफ्ट’मधून परत आलेला

सावळा विठ्ठल

खाणीत काम करून काळ्या रंगाने माखलेल्या खाण कामगाराला विठ्ठलाची उपमा दिलीय.

खाणीतून उपसलेल्या मातीच्या ढिगाऱयांनी गावाची विभागणी केली असून पावसात तेच गावाचे कर्दनकाळ ठरणार आहेत हे सांगताना कवी लिहितो,

पिकांनी सोसले ढिगाऱयांच्या रक्ताचे लोट 

‘भुईलोट’ झाल्यागत काही काळ सारे काही

हे मातीमिश्रीत पाणी कवीला रक्ताप्रमाणे भासतंय. ‘कडेलोट’ शब्दाशी साधर्म्य असणारा ‘भुईलोट’ शब्द इथे योजून कवितेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल आहे.

तुकोबा किती बरे झाले असते

तुम्ही आता जन्मले असते तर

तुमच्या गाथांना बुडवायला

कुठेच पाणी मिळाले नसते

‘कहाणी चवदार पाण्याची’ (पृ. क्र. 14) या कवितेतील ओळींत उपहासातून भीषण पाणी प्रश्नावर कवी लक्ष वेधतो. वर्षानुवर्षे विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठीच्या घोषणा दिल्या जातात, परंतु निसर्गाची, पर्यायानं समाजाची हानी करून मिळालेला विकास हा कोणाच्या भल्यासाठी आहे, असा रोखठोक सवाल आपल्या कवितांतून विचारताना ‘पोटातील आतडय़ाचे चित्र भूमिगत कोल माईनसारखे’ हे भीषण वास्तव समोर ठेवतो. त्यामुळे या कविता विकासाच्या विरोधातील ऊरबडवा कंठशोष न वाटता त्यातील वास्तवपूर्ण संदर्भांमुळे समतोल बिघडवू पाहणाऱया, मानवी मूल्यांचे-नैसर्गिक साधनसंपत्तीचे दमन करणाऱया व्यवस्थविरोधातील बुलंद आवाज ठरतात.

दगान

लेखक: किशोर कवठे

प्रकाशक: सप्तरंग प्रकाशन

पृष्ठ: 104, मूल्य: रुपये 125/-