‘26/11’ हल्ल्यातील जखमीला आर्थिक दुर्बल घटकातून घर द्या! हायकोर्टाची सूचना; सरकारने अधिक संवेदनशील व्हायला हवे

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाबच्या गोळीने जखमी झालेल्या देविका रोटावळला आर्थिक दुर्बल घटकातून घर देण्याचा विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला केली.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठाने ही सूचना केली. देविकाचा घराचा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्र्यासमोर ठेवावा. निदान ते तरी डोके वापरून यावर योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी दोन आठवडय़ांत निर्णय घ्यावा. देविका अतिरेकी हल्ल्यातील जखमी आहे. तिच्या घराच्या प्रस्तावावर निर्णय घेताना सरकारने अधिकच संवेदनशील व्हायला हवे, असेही न्यायालयाने नमूद केले.

घर नाकारताना सचिवाने डोके वापरले नाही

देविकाचा घराचा प्रस्ताव गृह विभागाच्या सचिवांनी अमान्य केल्याचे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. देविकाचे प्रकरण वेगळे असून संवेदनशील आहे. असा प्रस्ताव नाकारताना सचिवांनी डोके वापरले नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.

नुकसानभरपाई जखमांसाठी होती

नऊ वर्षांची असताना देविका अतिरेकी हल्ल्यात जखमी झाली. ती दिव्यांग झाली. या जखमांसाठीच तिला नुकसानभरपाई देण्यात आली होती. आता ती 25 वर्षांची झाली आहे. ती झोपडपट्टीत राहते. तिचे आयुष्य गरिबीचे आहे. घर देणार असल्याचे आश्वासन तिला सरकारने दिले होते. ते पूर्ण न झाल्याने तीन वेळा तिला न्यायालयात यावे लागले, असेही न्यायालयाने नमूद केले.