
सामना प्रतिनिधी । सोलापूर
जातीनिहाय आरक्षण देऊन समाजासमाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वच आरक्षण रद्द करा, अन्यथा सर्वांना समान आरक्षण देण्यात यावे. आरक्षणामुळे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्यात यावे, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. दरम्यान, मला वंचित हा शब्दच आवडत नाही. ज्यांनी तुम्हाला तुमच्या अधिकारांपासून वंचित ठेवले त्यांना बाजूला काढून वंचित ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला.
कॉम्प्युटरसारखी अत्याधुनिक वस्तू हॅक होऊ शकत असेल तर ईव्हीएम डबडे आहे. मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून का हटविण्यात आली? याच ईव्हीएममुळे आपला विजय झाला असला तरी आपला संशय कायम आहे. आपला विजय केलेल्या कामामुळे झाला आहे आणि त्याचमुळे आपण कॉलर उडवत असतो; अन्यथा लोकांनी आपली कॉलर काढली असती आणि मला चायनीज कॉलरचा शर्ट घालावा लागला असता, असेही ते म्हणाले.





























































