
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी जारी केलेल्या पात्रता निकषात आणखी एका निकषाचा समावेश करण्याची मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे व तोच धागा पकडून शिक्षक आपल्या पाल्याला मातृभाषेतून शिक्षण देतो किंवा नाही याचा समावेश आवर्जून या पुरस्काराच्या अटीमध्ये किंवा निकषांमध्ये करावा, अशी मागणी संघाने केली आहे.
मातृभाषेतील शिक्षणावर विश्वास नसलेल्या व अनुदानित शाळेतील नोकरीमुळे पुरस्कार घेणाऱया शिक्षकांचे हे योग्य मूल्यमापन असेल असे वाटते. आपल्या पाल्याला मातृभाषेत न शिकवणे, मातृभाषेतील शिक्षणावर विश्वास नसणे आणि तरीही मातृभाषेतील शाळेत नोकरी करून शासनाचा हा पुरस्कार स्वीकारणे हा विरोधाभास वाटतो, अशी टीका मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी केली आहे. याविषयीचे सविस्तर निवेदन त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणाऱया शिक्षकांची मुले मातृभाषेत शिकतात का, या निकषाचा विचार हे पुरस्कार देताना केल्यास पुरस्कारकर्त्याचे योग्य मूल्यमापन होईल, अशी भूमिका शेजुळे यांनी मांडली. आपल्या पाल्याला मातृभाषेतून शिकवणाऱया शिक्षकांच्या प्रस्तावाचा आधी प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.



























































