
आजचा दिवस क्रिकेटविश्वासाठी रिटायर्ड डे ठरला. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आज सकाळी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेटविश्वाला आणि आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर लगेच दुपारी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासननेही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर ही घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
हेनरिक क्लासनने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात केवळ 39 चेंडूंत 105 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती दिली. क्लासनने सोशल मीडियावर लिहिलेल्या लांबलचक पोस्टमध्ये म्हटले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेणे हा माझ्यासाठी एक दुःखद दिवस आहे. हा खरोखरच खूप कठीण निर्णय होता, परंतु मी पूर्णपणे समाधानी आहे. छातीवर दक्षिण आफ्रिकेचा बॅज घालून खेळणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सन्मान होता आणि नेहमीच राहील.
33 वर्षांचा आहे आणि त्याची निवृत्ती कोणीही समजू शकत नाही. क्लासनने दक्षिण आफ्रिकेसाठी चार कसोटी सामन्यांमध्ये 104 धावा केल्या आहेत, तर त्याने 60 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2141 धावा केल्या आहेत. जर आपण टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोललो तर त्याने 58 सामन्यांमध्ये 1000 धावा केल्या आहेत.
मॅक्सवेल एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. मॅक्सवेलने त्याच्या 13 वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीला निरोप दिला आहे. 2012 मध्ये पदार्पणापासून त्याने त्याच्या 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास 4 हजार धावा केल्या आहेत. 36 वर्षीय मॅक्सवेलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळय़ा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला दोनदा (2015 व 2023) एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या दरम्यान त्याने 4 शतके आणि 23 अर्धशतके ठोकली. मॅक्सवेलने गोलंदाजीतही योगदान दिले आणि कारकिर्दीत 72 बळी घेतले.