
गणेश चतुर्थी नंतर गोव्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. आज दिवसभरात 555 कोविड रुग्ण आढळून आले. 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 276 वर पोचला आहे. 473 जण बरे होऊन घरी गेले असले तरी रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत असल्याने लोक भयभीत झाले आहेत.
कोविड संकट गंभीर होत असून सरकारने त्याची दखल घेत नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. कोविडची लक्षणे नसलेले जे रुग्ण होम आइसोलेशनचा पर्याय निवडतात त्यांना आता सरकार एक किट मोफत देणार आहे. त्यात ऑक्सि मीटर, थर्मा मीटर, मास्क आणि इतर औषधांचा समावेश असणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज याबद्दल माहिती दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा कोविड मुक्त करण्यासाठी आप सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे जाहिर केले होते. त्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोविड रुग्णांना सर्व उपचार आणि सुविधा मोफत दिल्या जात असून आम्हाला कोणत्याही मॉडेलची गरज नाही, असे सांगत आपच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे. दिल्लीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर कोविड संकट नियंत्रणात आल्याचे सांगत गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या कामाचे कौतुक करत दिल्लीतील कामाचे श्रेय केंद्र सरकारला दिले.
दरम्यान गोव्यात आता पर्यंत 23 हजार 445 रुग्ण सापडले असून त्यातील 18 हजार 65 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज देखील 5 हजार 104 रुग्ण उपचार घेत असून आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 276 वर गेला आहे.
कोविड रुग्ण वाढत असून हॉस्पिटल्स फूल होत असल्याने लक्षणे नसलेले रुग्ण कोविड केअर सेंटर बरोबर होम आइसोलेशनचा पर्याय निवडू लागले आहेत. सध्या 394 जण होम आइसोलेशन मध्ये डॉक्टरांशी फोनवर सल्ला मसलत करून उपचार घेत आहेत.



























































