
सामना प्रतिनिधी। पणजी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी दुपारी अडीच वाजता पर्वरी येथील सचिवालयात दाखल झाले. पर्रीकर यांनी सचिवालयात बसून सरकारी अधिका-यांकडून कामांचा आढावा घेतला. त्याच बरोबर कुजीरा येथील पंडीत दिनदयाळ उपाध्याय विद्या संकुलाची सचिवालयातूनच पायाभरणी देखील केली. सायंकाळी साडेपाच वाजता पर्रीकर सचिवालयातून घरी परतले.
मुख्यमंत्री पर्रीकर हे चार महिन्यांनंतर 1 व 2 जानेवारी रोजी सचिवालयात दाखल झाले होते. दोन तास सचिवालयात बसून त्यांनी काम केले होते. नंतर मात्र ते वैद्यकीय उपचारांमुळे 11 दिवस मंत्रालयात येऊ शकले नव्हते. मुख्यमंत्र्यांना केमोथेरपी दिली जात होती,त्यामुळे गेले 11 दिवस ते सचिवालयात येऊन काम करु शकले नव्हते. पर्रीकर यांची प्रकृती आता थोडी सुधारली असून, सोमवारी दुपारी अडीच वाजता ते सचिवालयात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत एक छोटा कार्यक्रमही झाला. पर्रीकर गेल्या वर्षी 4 महीने वैद्यकीय उपचारांमुळे मंत्रालयात येऊ शकले नव्हते. त्यामुळे प्रशासन ठप्प झाल्याची टिका विरोधी पक्षासह आमदार, मंत्रीही करत होते. मंत्रिमंडळाच्याही बैठका होत नव्हत्या. मंत्रलयात मंत्रिमंडळाची एकही बैठक गेले चार महिने झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी मात्र मंत्रिमंडळाच्या दोन बैठका घेतल्या. या महिन्यात अद्याप बैठक झालेली नाही.
मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत नसले तरी खाजगी निवासस्थान आणि सचिवालयात राहून पायाभरणी सारखे कार्यक्रम करत आहेत.आज त्यांनी कुजीरा शिक्षण संकुलात उभारल्या जात असलेल्या पंडीत दिन दयाळ उपाध्याय विद्या संकुलात उभारल्या जाणार असलेल्या पायाभूत सुविधांची पायाभरणी केली.




























































