मास्क घालण्याचे नियम पाळले नसल्याने मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करा; गोवा काँग्रेसची मागणी

871

कोरोनाचे संकट जगासमोर उभे ठाकले असताना, गोवा सरकारला याचे गांभीर्य कळलेले नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे. खुद्द मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे तसेच गाडीत बसण्याचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे इतरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, अशी मागणी गोव्याचे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

पणजीकर म्हणाले, बुधवारीच्या मंत्रीमडळ बैठकीतून बाहेर येताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मायकल लोबो, माविन गुदिन्हो व विश्वजीत राणे यांच्या तोंडाला मास्क नव्हते. या सर्वांनी तसेच उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी योग्य अंतर ठेऊन गाडीत बसण्याचे नियम सुद्धा पाळले नाहीत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिर्वाय असताना मुख्यमंत्री सावंत व कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी मास्क न घातले नाही. त्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मुख्य सचिव तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा. त्याचप्रमाणे गाडीत योग्य अंतर ठेऊन बसण्याचे संकेत न पाळणारे मुख्यमंत्री, कचरा व्यवस्थापन मंत्री, पर्यटन मंत्री, पंचायत मंत्री तसेच आरोग्य मंत्री यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.

उघड्यावर मास्क न घालता फिरणे हे धोकादायक आहे.सचिवालयातील कर्मचारी, सुरक्षाकर्मी तसेच मंत्रीमंडळ बैठकीवेळी उपस्थित असलेल्यांच्या आरोग्याशी मुख्यमंत्री सावंत व त्यांच्या सहकारी मंत्र्यानी खेळ मांडला आहे. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचे कर्मचारी, सुरक्षाकर्मी तसेच वाहनचालक यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ,अशी आवाहन त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या