
गोवा भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात बंड सुरू आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर याला पणजीमधून तिकीट नाकारल्याने त्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी देखील बंडाचा झेंडा हाती घेत भाजपला राम राम ठोकणार आहेत. पार्सेकर देखील मांद्रे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
पार्सेकर यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. ”2017 ला भाजपने मला तिकीट दिले होते पण तेव्हा मी लोकांचा उमेदवार बनू शकलो नव्हतो पण या वेळेस पक्षाने मला तिकीट नाकारले आहे. पण यंदा मी लोकांचा उमेदवार बनलो आहे’, असे पार्सेकर यांनी सांगितले. पार्सेकर यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मंड्रेम व परसुआडेड येथे जाहीर बैठक घेत त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्यास सांगितले.
लवकरच पार्सेकर हे त्यांचे राजीनामा पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे पाठवणार आहेत. हे सांगताना त्यांना भाजपचे सचिव सतिश धोंड यांच्यावर निशाणा साधला. ”मी भाजपचे सचिव सतिश धोंड यांचे अभिनंदन करतो की त्यांनी मला पक्ष सोडण्यास मजबूर केले व मला अपक्ष म्हणून निवडणूक लढायला लावली. धोंड यांचे 50 टक्के लक्ष हे मंड्रेम तर 49 टक्के लक्ष हे बिचोलीम व फक्त 1 टक्का लक्ष हे इतर 38 मतदारसंघावर आहे’, अशी टीका पार्सेकर यांनी केली.
भाजपने पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उप मुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर, काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले जलस्त्रोत मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स, उप सभापती इजिदोर फर्नांडिस, मगो सोडून भाजपमध्ये आलेले दीपक पाऊसकर यांची तिकीटे कापली आहेत. विश्वजीत राणे आणि बाबुश मोन्सेरात या दोघांसह त्यांच्या पत्नींनाही भाजपने उमेदवारी दिली असून या चौघांची नावे पहिल्या यादीत आहेत.




























































