यंदा दीपावलीत पणजीत फक्त 5 फूटी ‘नरकासुर’

गोव्यात दीपावलीच्या पूर्वसंध्येला भव्यदिव्य नरकासुर बनवून त्यांचे दहन करण्याची परंपरा आहे.यंदा कोविड संकट असल्याने नरकसुर पाहण्यासाठी होणारी गर्दी कमी व्हावी यासाठी अनेकजण पुढाकार घेऊ लागले आहेत.राजधानी पणजीच्या महानगर पालिकेने यंदा फक्त 5 फूटीच नरकसुर बनवण्यास परवानगी मिळेल अशी मार्गदर्शक तत्व जारी करणार असल्याची घोषणा केली आहे.

राजधानी पणजी शहरातील दिवाळीच्या पूर्वसंधेला दिसणारे नेत्रदीपक आणि भव्य असे हालते नरकासुर प्रतिमा देखावे हे एक आकर्षक असते. जसा स्थानिकांचा हुरूप तसेच पाहणाऱ्यांकडून कौतुक यामुळे नरकासुर देखावे पणजी परिसरात मोठ्या संख्येने दिसतात. परंतु, कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर यावर्षी महापालिके नरकसुर बनवण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. पूर्वपरवानगीने काही पारंपरिक ठिकाणी पाच फूटांपर्यंतच नरकासुर उभारण्यास परवानगी मिळणार आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना महापौर उदय मडकईकर म्हणाले, जागतिक स्वरुपाचे हे संकट आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. शहरातील नरकासुर हे आकर्षक उभारले जात असतात. त्यामुळे ते पाहण्यासाठी गर्दी होती. ती टाळण्यासाठी यावर्षी नरकासुर बनवण्यास निर्बंध घालण्याचा मनपाने निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीच्या विधी होतात अशांना परवानगी घ्यावी लागेल. नरकासुर उंची कमाल पाच फूट ठेवावी लागेल. तसेच, फटाके फोडणे, डीजे वावण्यास मनाई असेल.

महापालिका हद्दीत आणि राज्यात कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना यामध्ये योगदान देणारे आरोग्य कर्मचारी यांचेही मडकईकर यांनी आभार मानतानाच हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

आपली प्रतिक्रिया द्या