बकरीच्या लेंडीवरुन राडा, तुफान हाणामारी, गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील इटाह गावात बकरीच्या लेंडीवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. या दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांवर गोळ्यादेखील झाडल्याचे वृत्त आहे. या हाणामारीत अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

इटाह गावात राहणाऱ्या योगेश आणि सुखवीर यांच्या कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून संपत्तीवरुन वाद आहे. सुखवीरच्या घराला लागूनच योगेशचे घर असल्याने किरकोळ गोष्टींवरुन त्यांच्यात सतत वाद होत असतात. सोमवारी सुखवीरची बकरी फिरता फिरता योगेशच्या घराच्या छतावर गेली व तिथे तिने लेंड्या टाकल्या. हे बघताच योगेश व त्याच्या कुटुंबाचा रागाचा पारा चढला. योगेशने आणि त्याच्या घरच्यांनी सुखवीर व त्याच्या कुटुंबाला शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे योगेश व त्याचे कुटुंबीयही भडकले व दोन्ही कुटुंबात शाब्दिक चकमक सुरू झाली. बघता बघता हा वाद इतका वाढला कि दोन्ही कुटुंबे एकमेकांवर लाठ्या काठ्या घेऊन तुटून पडली. यात अनेकांची डोकी फुटली तर काहींना मुका मार लागला. लाठ्या काठ्यांनी हाणामारी झाल्यानंतर योगेश आणि सुखवीरच्या कुटुंबीयांनी एकमेकांवर बंदुका रोखल्या आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. या हाणामारीचे वृत्त कळाल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कुटुंबांना शांत केले. त्यानंतर सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर योगेश आणि सुखवीर यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिासंनी दोन्ही कुटुंबाकडून देशी बनावटीची पिस्तुले व इतर हत्यारे जप्त केली.