लडाखमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तिघे थोडक्यात बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडाखमधील लेहच्या आग्नेयेस असलेल्या तांगत्से परिसरात भारतीय लष्कराचे चिता (Cheetah) हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 3 डिव्हिजन (त्रिशूल डिव्हिजन) चे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) यांच्यासह तीन लष्करी अधिकारी थोडक्यात बचावले. हेलिकॉप्टरचे वैमानिक लेफ्टनंट कर्नल आणि मेजर दर्जाचे अधिकारी होते. बुधवारी हा अपघात झाला असला तरी त्याची माहिती शनिवारी समोर आली. तिन्ही अधिकारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.

या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरी (CoI) स्थापन केली असून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे भारतीय लष्कराकडे असलेल्या जुन्या चिता आणि चेतक हेलिकॉप्टर ताफ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुढील दशकात या हेलिकॉप्टरची टप्प्याटप्प्याने निवृत्ती करून त्यांच्या जागी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) दाखल करण्याची योजना आहे. लष्कराच्या आधुनिकीकरण मोहिमेचा हा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

सन 1971 मध्ये सेवेत दाखल झालेले चिता हेलिकॉप्टर उच्च हिमालयीन भागातील मोहिमांचे मुख्य आधार राहिले आहे. या हेलिकॉप्टरचा वापर वाहतूक, टपाल सेवा, तोफखाना निरीक्षण, टेहळणी आणि हवाई रुग्णवाहिका म्हणून मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. विशेषतः हिमालयातील दुर्गम भागात जखमी जवानांना तातडीने मदत पोहोचवण्यात या हेलिकॉप्टरची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

मात्र 18,000 फूटांहून अधिक उंचीवरील भागात उड्डाण करताना चिता हेलिकॉप्टरवर मोठा ताण येतो. विरळ हवेमुळे रोटरची उचल क्षमता आणि इंजिनची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे कमी उंचीवर एका फेरीत पूर्ण होणारे काम उंच भागात अनेक फेऱ्यांमध्ये करावे लागते. तरीही सियाचीन हिमनदीवरील बाना टॉप, अशोक आणि सोनम यांसारख्या 19,600 ते 21,000 फूट उंचीवरील चौक्यांसाठी ही हेलिकॉप्टर आजही जीवनवाहिनी मानली जातात.

याच पार्श्वभूमीवर HAL ने विकसित केलेले लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) हे अत्यंत विरळ हवामान आणि उंच भागातील कार्यासाठी विशेषतः तयार करण्यात आले आहे. शक्ती-1U टर्बोशाफ्ट इंजिनाने सुसज्ज असलेले हे हेलिकॉप्टर 21,300 फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. तसेच साल्तोरो रेंजवरील जगातील सर्वाधिक उंच हेलिपॅडवर उतरण्याची क्षमता त्यात आहे. ताशी 235 किलोमीटर वेगाने उड्डाण करणाऱ्या या 3 टन क्षमतेच्या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह सहा जवानांना वाहून नेण्याची क्षमता आहे.

डिजिटल ग्लास कॉकपिट, नाईट-व्हिजन उपकरणांशी सुसंगत तंत्रज्ञान, वैद्यकीय मदत, जवानांची वाहतूक, टेहळणी आणि व्हीआयपी प्रवास अशा विविध कामांसाठी LUH चा वापर होणार असून भविष्यात भारतीय लष्कराच्या पर्वतीय मोहिमांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.