
अंधेरीचा धोकादायक गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने होणारी प्रचंड वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा पूल रिक्षा, दुचाकी, हलकी वाहने आणि प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. या पुलाची आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर पूल सुरू करता येईल असा अभिप्राय ‘आयआयटी’, मुंबईने दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पूल सुरू करण्याआधी ‘व्हीजेटीआय’ आणि ‘आयआयटी’ने सुचवलेल्या दुरुस्त्याही केल्या जाणार आहेत. येत्या दहा दिवसांत याबाबत कार्यवाही करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा आणि 1975 मध्ये बांधण्यात आलेला गोखले पूल सध्या धोकादायक जाहीर करण्यात आला आहे. यातच 3 जुलै 2018 रोजी कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे पुलाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने एप्रिलपासून आपल्या हद्दीमधील पुलाचे नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली असून हे काम 90 टक्के पूर्णही झाले आहे. मात्र रेल्वे हद्दीमधील भाग धोकादायक झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा भागही पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 7 नोव्हेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, मे 2023 पर्यंत पुलाची एक लेन सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे.
अशी होणार कार्यवाही
माटुंग्याच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटने गोखले पूल काही ठिकाणी दुरुस्त करून हलक्या आणि छोटय़ा वाहनांसाठी सुरू करता येईल, असा अहवाल दिला आहे. शिवाय पूल सुरू करण्याआधी ‘आयआयटी’ने सुचवलेल्या सूचनांचाही विचार केला जाणार आहे. तसेच कन्सलटंट आणि स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टही विचारात घेऊन आवश्यक दुरुस्ती केली जाईल. यानंतरच पूल सुरू करण्याबाबत दहा दिवसांत निर्णय घेता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
नवीन पूल बांधेपर्यंत एक लेन सुरू
गोखले पूल हा एकूण चार लेनचा आहे. या पुलाचे नव्याने बांधकाम करताना एकाच वेळी संपूर्ण पूल तोडण्यात येणार नसून पहिल्यांदा दोन लेन पाडण्यात येतील. यानंतर दोन लेनचे गर्डर बसविण्यात येतील. हे काम पूर्ण होईपर्यंत एक लेन रिक्षा, दुचाकी, हलकी वाहने आणि प्रवाशांसाठी सुरूच राहील.
एक गर्डर बसवण्याचे काम झाल्यानंतर दुसरी बाजू पाडून दुसरा गर्डर बसवण्यात येईल. दरम्यान, एक गर्डर बसवल्यानंतर वाहतूक सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात येईल. यामध्ये कोणताही अडथळा न आल्यास वाहतूक सुरू राहील. अन्यथा दोन्ही गर्डर बसवल्यानंतरच सर्व लेन सुरू करण्यात येतील.



























































