गोकुळच्या दुधाचा दर वाढणार; खरेदी दरात वाढ केल्याचा परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोकुळच्या म्हशीच्या दुधाच्या दरात लवकरच वाढ होणार असल्याचे समोर आले आहे. डेअरीने म्हशीच्या दुधाचा खरेदी उद्या रविवार, 1 ऑक्टोबरपासून प्रतिलिटरमागे दीड रुपयाने वाढवला आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या दुधाच्या विक्री दरातील वाढ अटळ असल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून गोकुळ ब्रॅण्डखाली मुंबईत दररोज आठ लाख लिटर दुधाचे वितरण केले जाते. सध्या म्हशीच्या दुधाची कमी झालेली उपलब्धता आणि चाऱ्याच्या किमती वाढल्याने शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया दुधाच्या दरात दीड रुपयाची वाढ केली आहे, तर गाईच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटरमागे दोन रुपयांची कपात केली आहे. मुंबईतील तबेलाधारकांनी चाऱ्याच्या वाढलेल्या किमतीचे कारण देत नुकतीच म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटरमागे एक रुपयाची वाढ केली आहे. त्यातच आता गोकुळने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाला दीड रुपयाची दरवाढ दिल्याने त्याची वसुली विक्री दरात वाढ करून केली जाण्याची शक्यता आहे.