गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 30 वर्षांनंतर प्रथमच सत्तांतर घडलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी विश्वास नारायण पाटील यांची आज दोन वर्षांसाठी एकमताने निवड करण्यात आली. यापूर्वीही त्यांनी तत्कालीन सत्ताधारी गटातून अध्यक्षपद उपभोगले होते. नेत्यांनी पाठविलेल्या बंद लिफाफ्यात पाटील यांचे नाव असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. गोकुळच्या वैभवात भर घालण्याची ग्वाही पाटील यांनी निवडीनंतर दिली.

सकाळी सर्व संचालक आणि नेत्यांमध्ये चर्चा झाली. नेत्यांकडून बंद लिफाफ्यातून चेअरमनपदासाठी विश्वास पाटील यांच्या नावाची चिठ्ठी दाखल झाली. यामध्ये 10 मे 2023 रोजी नवनियुक्त अध्यक्ष राजीनामा देतील, असा उल्लेख पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठविलेल्या पत्रात केला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी आघाडी’ने नुकत्याच झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीत 30 वर्षांपासून एकहाती सत्तेत असलेल्या माजी आमदार महादेव महाडिक आणि विद्यमान आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू आघाडी’चा 17 विरुद्ध 4 असा जोरदार पराभव केला. तत्कालीन सत्ताधारी आघाडीतील माजी अध्यक्ष असलेल्या विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी आघाडी बदलून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आघाडीतून निवडणूक लढविली होती. हे दोघेही अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.