कर्नाटकात सोने, लिथियमचा जॅकपॉट; उत्खननात सापडले मौल्यवान धातू

कर्नाटकात कोप्पल, रायचूर जिल्ह्यांत सोने (14 ग्रॅम/टन) आणि लिथियमचा मोठा साठा सापडला. मात्र आरक्षित वनक्षेत्रामुळे उत्खनन थांबले. कर्नाटकात भूगर्भात दडलेला एक मोठा खजिना सापडला आहे. राज्याच्या कोप्पल आणि रायचूर जिल्ह्यांतील आरक्षित वनक्षेत्रात सोन्याचा प्रचंड मोठा साठा व बॅटरीसाठी महत्त्वाचे असलेले लिथियमचे अंश सापडलेली माहिती समोर आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोप्पल जिह्यातील अमरापूर ब्लॉकमध्ये सापडलेल्या सोन्याचा ‘ग्रेड’ (प्रमाण) प्रति टन 12 ते 14 ग्रॅम इतका उच्च आहे. सामान्यतः 2 ते 3 ग्रॅम प्रति टन सोन्याचा साठादेखील उत्खननासाठी फायदेशीर मानला जातो.   जर खोलवरही हेच प्रमाण 8 ते 10 ग्रॅम प्रति टन राखले गेले, तर या खाणीतून दररोज 25 ते 30 किलोग्राम सोने काढले जाऊ शकते, ज्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असेल.

अमृतेश्वर ब्लॉकमध्ये बॅटरी उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लिथियमचे अंश पेग्माटाइट खडकांमध्ये आढळले आहेत. यामुळे लिथियम साठय़ाच्या राज्यांच्या यादीत आता जम्मू-कश्मीर आणि छत्तीसगडसोबत कर्नाटकचाही समावेश झाला आहे.