
नायगाव येथील नवीन पोलीस वसाहतीत राहणारे एपीआय सचिन जाधव यांच्या पत्नीने आज चांगली कामगिरी केली. काही कामानिमित्त वसाहतीबाहेर जात असताना त्यांना गेटवर सोनसाखळी व एक लॉकेट मिळाले. त्यांनी सदर दागिने कोणाचे याचा आजूबाजूलाच शोध सुरू केला. बराच वेळानंतर एक तरूण गेटजवळ शोधाशोध करताना दिसल्यानंतर पोलीस पत्नीने आवश्यक ती खातरजमा करून ते दागिने त्या तरुणाला सुपूर्द केले.
ऍन्टॉप हिल पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एपीआय सचिन जाधव हे नायगावच्या नवीन पोलिस वसाहतीत राहतात. त्यांच्या पत्नी श्रेया जाधव या मुंबईच्या खो खो खेळाडू तसेच उत्कृष्ट धावपटू आहेत. श्रेया या कामानिमित्त वसाहती बाहेर जात असताना त्यांना गेटवर सोनसाखळी व लॉकेट मिळाले. ते दागिने श्रेया यांनी ताब्यात घेऊन वसाहतीत राहणारे एएसआय उत्तेकर यांना त्याबाबत सांगितले. त्यानंतर दोघांनीही आजूबाजूला विचारपुस सुरू केली. तेवढय़ात एक कासावीस झालेला तरुण गेटजवळ काही तरी शोधताना त्यांच्या नजरेस पडला. मग श्रेया व उत्तेकर यांनी त्याला विश्वासात घेत विचारपूस करता त्याच्या दोन सोन्याच्या चेन व लॉकेट पडल्याचे त्या तरुणाने सांगितले. मग संदीप यादव या तरुणाने दागिन्यांचे बिल व आवश्यक कागदपत्र दाखविल्यानंतर श्रेया यांनी त्यांच्याकडील दागिने यादवला सुपूर्द केले. लाखो रुपयांचे दागिने परत मिळाल्यानंतर संदिप यादवचा आनंद गगनात मावेनासा झाला. संदिपला त्याचे हरविलेले दागिने परत देताना आनंद होत असल्याचे श्रेया यांनी सांगितले.


























































