सोनसाखळी चोरी व पोलीस बतावणी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

मुंबई आरटीओ क्रमांकाची वाहने त्यातही जीप दिसली की इराणी चोरटे सावध व्हायचे. लगेच वस्तीमध्ये तसे कळवून सर्वांना अॅलर्ट केले जायचे. इराणी चोरांची ही सावध भूमिका समजल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आपली व्यूहरचना बदलली. पोलिसांनी गनिमी कावा केला. खासगी टेम्पो, रिक्षांचा वापर आणि वेशभूषा बदलून आंबिवलीमध्ये सापळा रचला. मग वॉण्टेड असलेल्या एका सराईत चोराला उचलून आणले.

प्रॉपर्टी सेलने एका गुह्यात इराणी वस्तीतील एक पुरुष व महिलेला अटक केली होती. त्या गुह्यातील मुख्य सूत्रधाराचे नाव समजल्यानंतर पोलीस दोन वेळा आंबिवली येथील इराणी वस्तीत त्याला शोधण्यासाठी गेले. परंतु स्थानिक रहिवासी त्यातही महिलांच्या विरोधामुळे दोन्ही वेळा पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे पोलिसांनी आपली व्यूहरचना बदलली. कल्याण परिसरात इराणी चोरटे प्रत्येक गाडय़ांवर लक्ष ठेवतात. मुंबई आरटीओ क्रमांकाची वाहने त्यातही जीप दिसली की लगेच ते आपल्या वस्तीत सांगून सर्वांना अॅलर्ट करतात, ही बाब समजल्यानंतर प्रॉपर्टी सेलच्या पथकाने शक्कल लढवली प्रभारी निरीक्षक शशिकांत पवार तसेच निगडे, पवार, साळुंखे आदींच्या पथकाने पोलीस जीप पिंवा अन्य वाहनांचा वापर न करता खासगी टेम्पो, रिक्षांचा आधार घेतला. आपला गेटअप बदलला आणि आंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर तसेच परिसरातील रस्त्यांवर सापळा रचला. काबुली नौशाद अली जाफरी (40) हा सराईत चोरटा तेथे येताच पोलिसांनी त्याला उचलले. जाफरी हाती लागल्याने सोनसाखळी चोरीचे दोन तर तोतया पोलीस बनून फसवणूक केलेले सात अशा नऊ गुह्यांची उकल झाली.

जाफरी याच्या विरोधात पायधुनी, सांताक्रुझ, समतानगर, आर ए के मार्ग, काळाचौकी, व्ही.बी.नगर. अंधेरी, मेघवाडी, कस्तुरबा मार्ग, वर्सोवा, विलेपार्ले, मुलुंड, कांजूरमार्ग, चेंबूर, पार्कसाईट, नेहरूनगर, अॅण्टॉप हिल पोलीस ठाणे तसेच ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, अहमदाबाद येथील पोलीस ठाण्यात मिळून एकूण 36 गुह्यांची नोंद आहे.