तब्बल 21 तोळे सोने चोरून सुरक्षा रक्षकांनी धूम ठोकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gold

व्यावसायिकाच्या घरातून सोने चोरून पळालेल्या तीन नेपाळी सुरक्षारक्षकांना चारकोप पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. जीवन बुढा, मुकेश आणि संतोष बुढा अशी या तिघांची नावे असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे चारकोप परिसरात राहतात. तेथे जीवन हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. गेल्या महिन्यात तक्रारदार हे गोव्याला फिरायला गेले होते तेव्हा जीवन, मुकेश आणि फरार आरोपीसह एकाने तक्रारदाराच्या घरातून 35 तोळे सोने चोरून पळ काढला. आठ दिवसांनी ते घरी आले तेव्हा त्यांच्या घरचा दरवाजा उघडा होता. तक्रारदारांनी सोसायटीच्या टेरेसवरच्या मोटाररूमवरून पाहणी केली तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीचे दागिने दिसले. जीवनने चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यावर तक्रारदारांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पोलीस उपायुक्त डॉ. मोहन दहीकर, सहायक आयुक्त दिलीप यादव यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, वाघमारे, शिंदे, शिर्के यांच्या पथकाने तपास सुरू करून त्या तिघांना सिमला आणि हिमाचल प्रदेश येथून अटक करून मुंबईत आणले. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांकडून पोलिसांनी 21 तोळे सोने हस्तगत केले आहे.

सफरचंदाच्या बागेत करत होते नोकरी

चोरी केल्यानंतर तिन्ही आरोपी हे नेपाळला न जात सिमला येथे राहिले. पोलीस पकडतील म्हणून जीवन हा मोबाईल चालू बंद करत असायचा. जीवनने मुकेशला फोन करण्यासाठी मोबाईलमध्ये नवीन सिमकार्ड टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे पोलिसांनी विश्लेषण केले. चोरटे हे सिमला येथे सफरचंदाच्या बागेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

गावी रचला चोरीचा कट

जीवन हा काही वर्षांपासून त्या सोसायटीत काम करत होता. त्याने भाऊ मुकेशला कामाकरिता मुंबईत बोलावले. तो तक्रारदाराच्या घरी भांडी घासण्याचे काम करत होता. त्यामुळे घरात किती पैसे असतात ते मुकेशला माहीत होते. दिवाळीपूर्वी मुकेशही गावी गेला व त्याने गावी चोरीचा कट रचला. पळून गेलेल्या मुख्य सूत्रधाराला मुंबईत बोलावले. मुकेश आणि फरार आरोपीने चोरी केली तर चोरीच्या काही तास अगोदर जीवनने पत्नीला नातेवाईकांसह नेपाळला पाठवले होते.