चोरीच्या सायलेन्सरच्या मातीपासून बनवत होते सोने, तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इको गाड्यांचे सायलेन्सर चोरून त्यातील मातीपासून सोने तयार करणाऱया टोळीचा कांदिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुश्ताक शेख, सदाम मणिहार आणि सुजित यादव अशी त्या तिघांची नावे असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही टोळी चोरलेल्या सायलेन्सरमधील मातीतून सोने तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या महिन्यात कांदिवली पोलीस ठाण्यात इको गाडीचे सायलेन्सर चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. सायलेन्सर चोरी प्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक अविनाश पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान एका सीसी टीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक गाडी दिसली. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. चौकशी दरम्यान पोलिसांनी मुश्ताकला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत सदाम आणि सुजितचे नाव समोर आले. त्या तिघांना पोलिसांनी अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

मुश्ताक हा रात्रीच्या वेळेस रेकी करण्यासाठी बाहेर पडायचा. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इको गाडीचे सायलेन्सर तो चोरायचा. त्या सायलेन्सरमधून ते माती काढत असायचे. सायलेन्सरमधील माती वितळवून त्यापासून सोने तयार करत असायचे. साधारणपणे एका इको गाडीच्या सायलेन्सरमधून एक किलो माती बाहेर येते. ही टोळी ती माती काढून 20-25 हजारांना विकत होते. तर चोरलेल्या सायलेन्सरमधून माती काढून ते सायलेन्सर नाल्यात टाकत असायचे. आतापर्यंत या टोळीने 35 हुन अधिक गाड्यांचे सायलेन्सर चोरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सायलेन्सर चोरीच्या गुह्यात त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.