घरात ठेवलेल्या सोन्यातून कमवा पैसे.. कसे ते वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात सोने ही प्रत्येकाची आवड आहे. लग्नसमारंभ किंवा सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करण्यात येते. मात्र, हे खरेदी केलेले सोने तसेच घरात पडून राहते. एका सर्वेक्षणानुसार हिंदुस्थानातील घरांमध्ये, संस्थांमध्ये आणि मंदिरात 24 ते 25 हजार टन सोने नुसतेच पडून आहे. त्या सोन्याचा काहीच उपयोग होत नाही. फक्त सणाच्या दिवशी किंवा एखाद्या समारंभात घरातील महिला सोन्याचे दागिने वापरतात. त्याशिवाय त्याचा दुसरा कोणताच उपयोग होत नाही. त्यामुळे या सोन्यावर पैसे कमवण्याची संधी गोल्ड मॉनेटाइजेशन स्कीमद्वारे सरकारकडून देण्यात येत आहे.

घरात असलेले सोने या योजनेद्वारे बँकेत ठेवून त्यातून पैसे कमवता येतात. बँकेत ठेवलेल्या या सोन्यावर त्याच्या किंमतीच्या 2.25 ते 2.50 टक्के वार्षिक व्याज बँकेकडून देण्यात येते. या योजनेत सोन्याचे दागिने, सोन्याचे कॉइन किंवा सोन्याच्या इतर वस्तू बँकेत जमा करता येतात. या योजनेमुळे तुम्हाला घरात पडून असलेल्या सोन्यावर व्याजही मिळते आणि लॉकरचा खर्चही वाचतो. तसेच सोने चोरी होण्याचा धोका नसल्याने ते सुरक्षितही राहते.

हिंदुस्थानात घराघरात असलेल्या या सोन्याचा उपयोग व्हावा आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, यासाठी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने त्यात काही बदल केले आहेत. त्याला रिवॅम्ड गोल्ड डिपॉझिट स्कीम असे म्हणातात. या योजनेत मध्यम मुदतीसाठी म्हणजे 5 ते 7 वर्षांसाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी म्हणजे 12 वर्षांसाठी सोने जमा करण्यात येते. तसेच कमी मुदतीसाठी म्हणजे 1 ते 3 वर्षांसाठी सोने ठेवण्यात येते. मात्र, कमी मुदतीसाठी ठेवलेल्या सोन्यावर कमी व्याज मिळते.

मध्यम मुदतीवर सोन्याच्या किंमतीच्या 2.25 टक्के व्याज मिळते. तर दीर्घ मुदतीसाठी ठेवलेल्या सोन्यावर 2.50 टक्के व्याज मिळते. तर कमी मुदतीसाठी 0.60 ते 0.75 टक्के व्याज मिळते. ठरलेल्या मुदतीआधी योजनेतून बाहेर पडता येत नाही. तेवढ्या वर्षांचा लॉक इन काळ असतो. या योजनेत जमा करण्यात येणाऱ्या सोन्याच्या शुद्धतेची तपासणी बँकेने ठरवलेल्या केंद्राकडून करण्यात येते. त्यानंतर त्याची किंमत ठरवून या योजनेत ते जमा करण्यात येते.

घराघरात किंवा मंदिर, संस्थामध्ये पडून असलेले सोने बँकांमध्ये जमा व्हावे आणि सोन्याची आयात कमी व्हावी, या हेतूने सरकारने ही योजना आणली आहे. तसेच हे सोने बँकेत जमा झाल्यास अर्थव्यवस्थेलाही त्याचा हातभार लागणार आहे. या योजनेत कमीतकमी 10 ग्रॅम सोने जमा करण्याची अट आहे. तर जास्तीतजास्त कितीही सोने जमा करता येणार आहे. जमा करण्यात आलेल्या या सोन्याची जबाबदारी एसबीआयकडे असणार आहे.

या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर आकरण्यात येणार नाही. या योजनेत सोने जमा करण्यासाठी कोणत्याही बँकेत गोल्ड डिपॉझिट अकांउट उघडण्यात येते. या योजनेत जमा केलेले सोने वितळवून किती सोने जमा केले, याचे प्रमाणपत्र खातेधारकाला देण्यात येते. तसेच कालावधी पूर्ण झाल्यांतर त्या काळात सोन्याच्या बाजार मूल्यानुसार खातेधारकाला सोन्याची रक्कम देण्यात येते. खातेधारकाला मूळ सोने परत मिळत नाही. मात्र, घरात असलेल्या सोन्यातून कमाई करण्यासाठी ही चांगली योजना आहे. मात्र, आपल्याकडे सोन्याच्या दागिन्यांची आवड लक्षात घेता, या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नाही.