
एखादी चोरीची घटना भल्याभल्यांची बुद्धी चक्रावून सोडते. असाच काहीसा प्रकार राजस्थानच्या सीकर येथे झाला आहे. इथे झालेल्या एका चोरीच्या घटनेत अवघ्या 25 सेकंदांत दागिन्यांनी भरलेली बॅग गायब झाली आहे.
ही घटना सीकरी बाजार येथे घडली आहे. येथे शिवसिंहपुरा येथे राहणारं एक जोडपं सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी आलं होतं. त्यांनी खरेदी केलेले दागिने बाईकच्या डिकीत ठेवले आणि त्यांनी त्याच बाईकवरून पुढे प्रवास सुरू केला.
काही वेळाने काही कामासाठी त्यांनी बाईकची डिकी उघडली, तेव्हा त्यांची दागिन्यांची पिशवी गायब झाल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी याची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
कारण, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अवघ्या 25 सेकंदांत त्यांची बॅग गायब झाल्याचं दिसत होतं. जेव्हा हे जोडपं बाईकच्या डिकीत बॅग ठेवून जात होतं. तेव्हाच पाठीमागून आलेल्या चोराने त्यांच्या डिकीतून चलाखीने दागिन्यांची बॅग काढली आणि तिथून फरार झाला.
चोरी झालेल्या बॅगेत एक मोबाईल, सोन्याची अंगठी, सोन्याच्या कुड्या, तीन चांदीच्या अंगठ्या, एका चांदीच्या चेनसह अन्य काही दागिने होते. सध्या पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवली असून त्यांनी चोराचा शोध सुरू केला आहे.




























































