
खेड तालुक्यातील धरणं क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सगळीच धरणं 100 टक्के भरली आहेत. धरणं 100 टक्के भरून वाहू लागल्याने यावर्षी तालुक्याला भेडसावणारी पाणी टंचाई काही अंशी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यात नातूवाडी, शेलारवाडी, कोंडिवली, शिरवली, तळवट, खोपी, पोयनार, न्यू मांडवे ही धरणे आहेत. या धारणांपैकी पोयनार आणि न्यू मांडवे या धरणे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या धरणांमध्ये पाणी साठा केला जात नाही. अन्य धरणांमध्ये पाणीसाठा केला जातो. परंतु नातूवाडी आणि शिरवली ही दोन धरणं वगळता अन्य कोणत्याही धरणांचे पाणी सिंचनासाठी वापरले जात नाही. कालव्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याने या धरणांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना दुबार शेती करता येत नाही मात्र धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने टंचाईच्या काळात धरणातील पाण्याने ग्रामस्थांची तहान भागवणे शक्य होते.
खेड तालुक्यातील चोरटी नदीवर बांधण्यात आलेले नातूवाडी हे धरणं खेड तालुक्यातील अनेक गावांसाठी संजीवनी ठरत आले आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील अनेक शेतकरी दुबार पिकं घेऊ लागली आहेत तर धरणातील पाण्यावर अनेक नळपाणी योजनाही सुरु आहेत. आगामी काळात खेड शहरालाही याच धरणातील पाणी गुरुत्वबलाने पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेले हे धरणं आता 100 टक्के भरले असल्याने दुबार पिकं घेण्याऱ्या शेतऱ्यांसह पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार असल्याने टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तालुक्यातील शिरवली धरणातही मुबलक पाणीसाठा आहे. या धरणातील पाण्यावर काही गावांमध्ये दुबार पिकं घेतली जातात, काही ग्रामस्थांनी भाजीपाल्याच्या बागा देखील फुलविल्या आहेत. मात्र शेलारवाडी, तळवट, खोपी, कोंडिवली, या धरणांच्या कालव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असूनही यातील एकही थेंब सिंचनासाठी वापरला जात नाही.
पोयनर आणि न्यू मांडवे या धरणांची कामे वेळेत पूर्ण होऊन पाणी साठा करण्यास सुरवात झाली असती तर अन्य काही गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघाला असता तसेच काही गावातील शेतकऱ्यांना दुबार शेतीही करण्यात आली असती मात्र या दोन धरणांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने धारणांसाठी आतापर्यंत केलेला खर्च आजतरी पाण्यात गेल्यासारखा आहे.
तहसीलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यात यंदा 1 जून ते 24 सप्टेंबर दरम्यान 4229.80 मिलीमीटर इतका पाऊस पडला गेल्या वर्षी याच मुदतीत 4023.50 इतका पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी तालुक्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे. या वर्षी तालुक्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण वाढले असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न काही अंशी निकाली निघणार आहे.



























































