मोईन अलीचा कसोटी क्रिकेटला गुडबाय

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीने सोमवारी कसोटी क्रिकेटला गुडबाय करत असल्याची घोषणा केली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. ब्रिटिश मीडियाने याबाबतचे वृत्त दिले असून ‘आयसीसी’नेही याला दुजोरा दिला आहे.

‘आयपीएल’च्या 14व्या हंगामात मोईन अली चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याबाबत त्याने इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट आणि मुख्य कोच ख्रिस सिल्वरवुड यांना अवगत केले आहे. 34 वर्षीय मोईन अलीने 2014 साली श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 64 कसोटींत 5 शतके व 14 अर्धशतकांसह 2 हजार 914 धावा केल्या आहेत. त्याच्या फलंदाजीची सरासरी 28.29 इतकी आहे. गोलंदाजीत मोईन अलीने 195 बळी टिपले असून यात त्याने 13 वेळा 4, तर 5 वेळा 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. याचबरोबर एकदा त्याने 10 कसोटी बळी टिपण्याचाही पराक्रम केलेला आहे.

3 हजार धावा अन् 200 बळीला मुकणार

मोईन अली यापुढे एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळणार आहे. याचबरोबर तो काQटी आणि लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहे. मात्र कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्याने मोईन अली कसोटीत 3 हजार धावा आणि 200 बळीला मुकणार आहे. यासाठी त्याला केवळ 84 धावा आणि 5 बळींची गरज होती.

‘‘कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होताना मी समाधानी आहे. कारण पूर्ण विचारांती मी हा निर्णय घेतलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे टेस्ट क्रिकेटच बेस्ट आहे. मात्र आता मी 34 वर्षांचा झालोय. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी मी कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’’ – मोईन अली

आपली प्रतिक्रिया द्या