विचारमंथन दोन वेगळय़ा वाटांचे!

575

‘74 पावसाळ्यांचा जमाखर्च’ आणि ‘गुगलीफाय’. प्रायोगिकता हा मराठी प्रेक्षकांचा आवडता प्रकार. या दोन भिन्न वाटा मराठी रंगभूमीचे विचारमंथन दर्शवतात

मराठी नाटक सतत इव्हॉल्व्ह आणि ट्रान्सफॉर्म होत आलंय. सुरुवातीला संपूर्ण रात्रभर चालणारी पाच अंकी संगीत नाटकं असायची. ती बदलून तीन साडेतीन तास चालणारी सामाजिक नाटकं आली. तीही जाऊन दोन सवादोन तासांची फास्ट ट्रक एन्टरटेन्मेन्टची दोन अंकी नाटकं आली. हा बदल सभोवतालच्या समाजाच्या वेगाचा फरक होता. आताही आपला समाज वेग बदलतोय. क्षणार्धात अख्खं विश्व माणसाच्या तळहातांवर येऊ लागलंय. स्मार्टफोनमुळे माध्यमं बदलताहेत. स्ट्रीमिंग नावाचं नवीन माध्यम धुमाकूळ घालतंय. या नवीन माध्यमात सकस आशय आणि मनोरंजन याचा संगम होऊ पाहतोय, पण एक मेख आहे. आजूबाजूच्या विश्वापासून अलिप्त होऊन कलात्मकतेचा आस्वाद घेणं स्ट्रीमिंगला शक्य नाही. सभोतालचं भान ठेवून रसास्वाद घेण्यात मानवाचा अटेन्शन स्पॅन कमी झालाय. म्हणून तर या माध्यमातील कलाकृती या पाच मिनिटांपासून ते पाऊणतासापर्यंतच्या असतात. अशात मराठी नाटक बदललं नाही तर नवल. सध्या मराठी नाटय़सृष्टीत नाटय़ अभिवाचनाबरोबरचं दीर्घांक हा प्रकार प्रबळ होत चालला आहे. आज आपण नुकतेच सादर झालेले दोन दीर्घांक इथे पडताळणार आहोत.

‘74 पावसाळ्यांचा जमाखर्च’- विजय तेंडुलकर मराठी नाटय़सृष्टीच्या प्रायोगिक चळवळीचे आद्य पितामह. त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने अविष्कार संस्थेने आठवडय़ाभराचा समारोह आयोजित केला होता तेव्हा गिरीश पतके या रंगकर्मीला नेहमीप्रमाणे तेंडुलकरांचं नाटक सादर करायचं नव्हतं. गिरीशने मग तेंडुलकरांचा एक लेख रंगमंचावरून सादर करायचं ठरवलं. वयाच्या 74 राव्या वर्षी तेंडुलकरांनी बराचसा आत्मचिंतनपर लेख लिहिला होता तो गिरीशने दिग्दर्शित करून महोत्सवात सादर केला ‘74 पावसाळ्यांचा जमाखर्च’ हा तो प्रयोग.

‘74 पावसाळ्यांचा जमाखर्च’ हे एका माणसाचं त्याची पत्नी गेल्यानंतरच्या काळातलं चिंतन आहे. लाइफ इज अ टर्मिनल डिझिज – या विचारातून या  चिंतनाची सुरुवात होते. गिरीश पतके यांनी दिग्दर्शनात या लेखातील डिप्रेसिव्ह छटा अगदी परफेक्ट पकडली आहे. सादरीकरणात लिखाणातील नर्मविनोदही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘74 पावसाळ्यांचा जमाखर्च’ हा लेक अगदी बालवयातील आठवणींपासून तारुण्यातील गुलाबी वैफल्यातून जात वार्धक्यातील हिशेबापर्यंत प्रवास करतो. गिरीशने या तीन स्टेजेस रंगमंचावर तीन वेगवेगळे एरिया करून दर्शवले आहेत. प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी ब्लॅकआऊट योजले आहेत. जमाखर्च लिहिताना एक रकाना संपला की कर्सर आपोआप पुढच्या रकान्यात जावा तसा अनुभव येतो. याचं कारण की, तेंडुलकरांनी लेख लिहिताना आठवणी क्रमवार मांडलेल्या नाहीत. किंबहुना त्या जशा सुचतील तशा उतरलेल्या आहेत. कधी घटनाक्रमाच्या ओघात, कधी विषयाला धरून तर कधी निव्वळ आठवण्याचा प्रयत्न केला म्हणूनही. गिरीश पतके यांनी हे सगळं खूप प्रामणिकपणे सादर केलेलं आहे.

‘74 पावसाळ्यांचा जमाखर्च’चा प्रयोग जो सादर होतो तो थोडासा कन्फ्युझिंग आहे, कारण ते अभिवाचन आहे की सादरीकरण हे क्लियर होत नाही. लेखकाने लेख लिहिला. त्या लिखाणाचं क्रापिंॊटग लेख या माध्यमासाठी परिणामकारक आणि नेमकं आहे. इथे माध्यम बदलून सादरीकरण करताना काही वेगळे संस्कार हवे होते का? हा प्रश्न पडतो. कदाचित मला ठोकताळ्यातील नाटकं पाहण्याची सवय असल्याने झालं असेल असं, पण गिरीश पतके यांच्या सादरीकरणात एक विलक्षण स्तब्धता जाणवली.

 • नाटक-74 पावसाळ्यांचा जमाखर्च
 • निर्मिती-आविष्कार
 • लेखक-विजय तेंडुलकर
 • सादरकर्ते-गिरीश पतके

‘गुगलीफाय’ –  नव्या पिढीच्या या तांत्रिक दुनियेत त्यांचा सर्वसमावेशक असा मदतनीस म्हणून गुगलची विशिष्ट ओळख आहे. गुगल आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं. हल्ली ‘शोधन्’ाा’ सांगणं संपलंय आणि ‘गुगल करं’ सांगणं सुरू झालंय. पण या डिपेंडन्सीचा दूरवर होणारा परिणाम काय असू शकतो याची गोष्ट म्हणजे ‘गुगलीफाय’ हा चैतन्य सरदेशपांडे लिखित आणि अमर कुलकर्णी दिग्दर्शित दीर्घांक.

‘गुगलीफाय’ हे प्रॉपर नाटक आहे. त्याला संगीत आहे, ध्वनी संकेत आहेत, नेपथ्य आहे, वेशभूषा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात नाटय़ आहे. कथेला एक सुरुवात, मध्य आणि शेवट आहे. चैतन्यचं लिखाण एका खूप महत्त्वाच्या विषयाला हात  घालतं. ‘गुगलीफाय’ हे द्वीपात्री नाटक आहे. एका रिलेशनशिपमध्ये असणाऱया जोडप्याची ही गोष्ट. त्यात स्वतः चैतन्य अणि पूजा कातुर्डे हे दोन कलाकार भूमिका करतात. दोघांनीही अभिनय उत्तम केला आहे. लिखाणात ‘गुगलीफाय’ स्पष्ट आहे. द्वीपात्री नाटकाची गंमत विषयाच्या विविध बाजू मांडून त्या दोन पात्रांमध्ये संवादांचा गिव्ह ऍण्ड टेक साधण्यात असते. इथे पूजाचं पात्र अंमळ निबुर्द्ध रंगवल्याने ती संभावनाचं संपते. तंत्रज्ञानावरची डिपेंडन्सी अधोरेखित करण्यासाठी असं केलं असावं. नाटय़मयता वाढवण्यासाठी ‘गुगलीफाय’ काही वेळासाठी सस्पेन्स थरार नाटय़ होतं. याने नाटय़ निश्चित वाढतं, पण विषय सुटल्यासारखा वाटतो. श्याम चव्हाण प्रकाशयोजनेतून इथे सस्पेन्स अधिक  करण्यात यशस्वी होतात. संतोष जढाळ यांचं नेपथ्य नाटकाला पूरक आहे. मध्यभागी जंकपासून साधलेलं सिटिंग फोकस घेतं आणि इतर कुठेही जंक नेपथ्यात ती स्टाईल नाही हे खटकतं. रूपेश दुदम यांचं संगीतदेखील नाटक अधिक रंगवतं. ‘गुगलीफाय’ एक उत्तम विषय आहे. लिखाणात एककल्लीपणा आहे, कारण दुसरी बाजू मांडायला पात्रंच नाहीये. प्रयत्न उल्लेखनीय आहे. चैतन्य सर्जनशील लेखक आहे. ‘गुगलीफाय’ हे आजच्या विषयावरचं नाटक आहे.

 • नाटक- गुगलीफाय
 • निर्मिती , मनश्री आर्ट्स
 • निर्माते-संतोष जदाळ
 • लेखक- चैतन्य सरदेशपांडे
 • प्रकाश – श्याम चव्हाण
 • रंगभूषा- उल्लेश खंदारे
 • संगीत- रुपेश दुदम
 • वेशभूषा-तिथी घाडी
 • नृत्य- शशी सिंग
 • सूत्रधार- राकेश तळगावकर
 • दिग्दर्शक-अगर कुलकर्णी
 • कलाकार- पूजा कातुर्डे, चैतन्य सरदेशपांडे
आपली प्रतिक्रिया द्या