गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचा संपाचा निर्णय; वेतनवाढ मिळत नसल्याचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sugarcane-worker

गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेने दरवाढीच्या मुद्यावर संप पुकारला असून या संपाचे नेतृत्व माजी ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे करणार आहेत. त्यामुळे चालू हंगामात मुंडे विरोधात साखरसंघ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. या संपाला भाजप आमदार मोनिका राजळे यांनीही पाठिंबा दिला आहे. राजळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या साखरसंघ व ऊसतोड मजूर संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाला होता. त्यानंतर महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नसल्याने चालू हंगामात संप करण्याचं निर्णय घेण्यात आला. याबाबत 30 सप्टेंबर रोजी मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाथर्डी तालुक्यात मोठ्या संख्यने ऊसतोड मजूर असल्याने त्यांचाही या संपाला पाठिंबा मिळावा म्हणून राजळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डिझेलचे दर वाढले. मात्र वाहतुकीचे दर वाढले नाही.मजुरांचे विम्याचे पैसे कापून घेतले जातात. मात्र अपघात झाल्यावर विम्याचे पैसे मिळत नाहीत. महागाई वाढल्याने मजुरांना मजुरी परवडत नाही, असा सूर आळवत कोणत्याही परिस्थितीत संप अटळ असून राजळे या जरी साखर कारखाना चालवत असल्या तरीही त्यांनी या संपाला पाठिंबा द्यावा अशी विनंती राजळे यांना केली. राजळे यांनी पंकजा मुंडे या आपल्या नेत्या असल्याने आपणही या संपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.