‘लव्ह जिहाद’वरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी, चुकीची आकडेवारी देणाऱ्या मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लव्ह जिहाद’ प्रकरणावरून आज विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. ‘लव्ह जिहाद’ची राज्यात एक लाखावर प्रकरणे नोंदली गेल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली होती. ती माहिती चुकीची असून लोढा यांनी त्याबद्दल सभागृहाची माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षांच्या आमदारांनी केली. त्यावर लोढा यांच्या समर्थनार्थ सत्ताधारी मंत्री आणि आमदार उभे राहिल्याने सभागृहात काही काळ गोंधळ झाला.

मंगलप्रभात लोढा हे सभागृहात चुकीची माहिती देत आहेत, असा मुद्दा समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मांडला. लोढा यांनी राज्यातल्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘लव्ह जिहाद’ नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसून सत्ताधारी लोक धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवत आहेत असे ते म्हणाले.

त्यावर लोढा यांच्या समर्थनार्थ मंत्री गुलाबराव पाटील उभे राहिले. ‘लव्ह जिहाद’ नावाची गोष्ट अस्तित्वात नाही असे ज्यांना वाटते त्यांनी माझ्या गावी यावे. माझ्या गावातही अशी दोन प्रकरणे झाली आहेत. दुबईला नेऊन मुली विकल्या जातात, असे पाटील म्हणाले. आव्हाड हे मुंब्य्रात राहत असल्याने तेथील मतांसाठी बोलत आहेत असे ते म्हणाले.

भाजप आमदार आशीष शेलार यांनीही लोढा हे हिंदू भगिनींसाठी बोलले म्हणून माफी मागावी का, असा सवाल उपस्थित केला. मंत्री लोढा हे कोणत्याही धर्म किंवा पंथाबद्दल बोलले नव्हते, असे ते म्हणाले.

सभागृहात या मुद्दय़ावरून गोंधळ झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हस्तक्षेप करून सर्व सदस्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

जितेंद्र आव्हाड यांनीही अबू आझमी यांची मागणी लावून धरली. लोढा ज्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणताहेत त्याला आम्ही ‘इंटरफेथ मॅरेजेस’ असे म्हणतो. दोन कुटुंबांतील परस्पर विश्वासाने ती झाली आहेत. अशी एक लाख नव्हेत, तर 3,693 प्रकरणे नोंदली गेली आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले.