दुष्काळामुळे जिल्ह्यात आणीबाणी, तरीही सरकार गंभीर नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे बीड जिल्ह्याची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. मनरेगाची कामे मजुरांसाठी सुरू केल्याचा कांगावा सरकार करत आहे. परंतू ही कामे गावापासून चार-चार किलोमीटर लांबीवर असून या ठिकाणी महिलांना कामासाठी जातांना अनंत अडचणी येत आहे. पाण्याअभावी जिल्ह्यातील मृदा कडक झाली असून खड्डे खांदण्याचे काम करण्यापूर्वी माती मुलायम करण्यासाठी अगोदर पाणी ओतावे लागत असून त्यानंतरच ही कामे करता येतात. वास्तविक या कामासाठी दिली जाणारी मजुरी अत्यंत नगण्य असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याचे स्थलांतर होत असून ऊस तोडीला जाणाऱ्या मजुरांपेक्षाही इतर लोकांचे होणारे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात दुष्काळाने आणीबाणीची स्थिती निर्माण झालेले असतांना राज्य आणि केंद्र सरकार केवळ निवडणुका तोंडावर असल्याने जुमलेबाजी करण्यात व्यस्त आहे. त्यांना दुष्काळाचे गांभीर्य नाही अशा शब्दात भाकप नेत्या कॉ.वृंदा करात यांनी सरकारवर टिकेची झोड डागली.

बीड जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर आणि महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाकप नेत्या वृंदा करात दोन दिवसापासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी त्यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कॉ.उत्तम बाने, मोहन जाधव यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वृंदा करात म्हणाल्या, राज्य सरकारने ऑक्टोबर २०१८ मध्ये राज्यात दुष्काळ जाहीर केला. मात्र बीड जिल्ह्यात मागील दोन महिन्यात दुष्काळी उपाय योजनेसाठी एकही काम सुरू केले गेले नाही. मागील आठ महिन्यापासून जिल्ह्यात संकट निर्माण झाले असतांना यावर ठोस उपाय करण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. जिल्ह्यात सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून सरकार आता तात्काळ उपाय योजना केल्या नाहीत तर भीषण स्थिती निर्माण होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.