सामाजिक संस्थेनेच लाटले महिलांचे शासकीय अनुदान, कायाकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक

कोरोना प्रादुभार्वामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाने संबंधित महिलांसाठी वितरित केलेल्या अनुदानामध्ये सामाजिक संस्थेनेच अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार पर्वतीतील लक्ष्मीनगरमध्ये घडला आहे. शासनाकडून वितरित करण्यात आलेल्या प्रत्येकी महिलांच्या नावे 15 हजारांपेकी 10 हजार रुपये घेऊन, संस्थेने अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केली आहे. ही घटना यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत घडली.

गौरी तेजबहादूर गुरूंग (32), सविता लष्कर (26), सारिका अशोक लष्करे (30) अमोल दत्तात्रय माळी (25, धनकवडी,) महेश राजू घडसिंग (26,रा. गणेशखिंड रोड ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नायब तहसिलदार प्रकाश व्हटकर यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कोरोना प्रादुभार्वामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाने संबंधित महिलांसाठी तीन महिन्यांसाठी प्रत्येकी 5 हजारांचे अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी संबंधित महिलांचे ओळखपत्र न घेता अनुदान वाटप करण्याचे आदेश शासनाने तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले होते. त्यानुसार वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची यादी बनविण्याचे काम कार्यालयाने कायाकल्प सामजिक संस्थेला दिले होते. याद्या बनविण्याचे काम सुरू असताना संस्थेने गोरगरीब महिलांना संस्थेकडून प्रत्येकी 5 हजार रुपये देणार असल्याची बतावणी केली.

त्यानंतर शासनाकडून संबंधित महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 15 हजारांचे अनुदान जमा केले होते. त्यानंतर कायाकल्प संस्थेतील आरोपींनी संगनमत करून संबंधित महिलांकडून प्रत्येकी 10 हजार रूपये सामाजिक संस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत, असे सांगून माघारी घेतले. महिलांकडून प्रत्येकी 10 हजार रूपये घेऊऩ फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय खोमणे तपास करीत आहेत.

शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात महिलांची फसवणूक
कोरोना प्रादुभार्वामुळे शासनाने वेश्या व्यावसायिक महिलांना अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार महिलांना शासनाकडून मिळालेल्या अनुदानातील रकमेत कायाकल्प संस्थेने अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 70 ते 75 महिलांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
– कृष्णा इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस निरीक्षक

आपली प्रतिक्रिया द्या