देशाचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार कोण?, सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपण्याआधी केंद्राची शोधमोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे विद्यमान मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिनाभर आधी शोधमोहीम सुरू केली असून मुख्य आर्थिक सल्लागार पदासाठी अर्ज मागवले आहेत. पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याआधी नवीन मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.

विद्यमान सल्लागार सुब्रमण्यम यांनी तीन वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर कार्यकाल वाढवण्यासाठी विनंती करणार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पुन्हा हैदराबादेतील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकवण्यासाठी जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची 7 डिसेंबर 2018 रोजी देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नेमणूक झाली होती, तर त्याच वर्षी 24 डिसेंबरला त्यांनी पदभार स्वीकारला होता. केंद्र सरकार त्यांच्या जागी डिसेंबरमध्येच नवीन सल्लागाराची नेमणूक करू शकते, असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवला आहे.

उमेदवाराने अर्थशास्त्र किंवा फायनान्समध्ये मास्टर डिग्री मिळवलेली असावी. कमाल वय 56 वर्षे असावे, तसेच पेंद्र किंवा राज्य सरकारच्या संस्था, रिझर्व्ह बँक किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ, स्वायत्त संस्थांमध्ये एक वर्षाचा प्रशासकीय अनुभव असावा, आदी अटी सरकारने निश्चित केल्या आहेत.

आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील सर्च कमिटीने कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची निवड केली होती. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्य आर्थिक सल्लागार पदाची नेमणूक महत्त्वपूर्ण ठरली आहे.