अनोळखी कॉलरची कुंडली समजणार

ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. त्यातही मोबाईल फोनवरून ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण जास्त आहे. या घटना रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांना हवे तसे यश आलेले नाही. अशातच सरकार पुन्हा अॅक्शन मोडवर आलेय. अशा घटना रोखण्यासाठी 100 दिवसांचा प्लॅन तयार करण्यात आलाय. यामध्ये अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलची सगळी पुंडलीच समजणार आहे. तसेच फ्रॉड करणाऱयाचा नंबर तत्काळ ब्लॉक केला जाईल.
कॉलर आयडीचा नियम लागू

सरकारने कॉलिंग नेम प्रेझेंटेशन म्हणजे सीएनएपी सर्व्हिस 100 दिवसांत सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशात 1 ऑगस्टपासून कॉलर आयडी सिस्टीम लागू होऊ शकते. तसेच नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सी सुरू केली जाईल. आतापर्यंत 13 दशलक्ष सिमकार्ड ब्लॉक तर 70 हजार पॉइंट ऑफ सेल मशीन डिस्कनेक्ट केल्या आहेत. या वर्षी सुमारे 1.56 लाख हॅण्डसेटवरून फ्रॉडच्या घटना घडल्या आहेत. या काळात 200 फेक हँडल बंद करण्यात आले.

100 दिवसांचा प्लॅन
सरकारने 100 दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. त्यामध्ये फ्रॉड नंबर ब्लॉक करण्यात येईल. यासोबतच ऑनलाईन फ्रॉडच्या तक्रारींसाठी नॅशनल सायबर सिक्युरिटी ही नोडल एजन्सी उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा फ्रॉड वेळीच ओळखला जाईल.

ट्रायचा पुढाकार
स्पॅम कॉल्सच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी ‘ट्राय’ अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने देखील पुढाकार घेतला आहे. एखाद्या अनोळखी नंबरवरुन कॉल आल्यानंतर स्क्रीनवर नंबरसोबत त्याच व्यक्तीचे नाव दिसावे असा प्रस्ताव अलिकडेच ‘ट्राय’ने मांडला आहे. ट्रायने दिलेल्या या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास टेलिकॉम कंपन्यांना याबाबत निर्देश देण्यात येतील. इंट्रोडक्शन ऑफ कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (सीएनपी) असे नाव या सर्व्हिसला देण्यात आले आहे.

एखाद्या अनोळखी नंबरवरुन फोन आल्यानंतर तो नंबर तपासण्यासाठी सध्या लोक ट्रू कॉलर किंवा तशाच अन्य अॅप्सची मदत घेतात. मात्र, यावर देखील खरं नावच मिळेल हे खात्रीने सांगता येत नाही. सीएनपी सुविधा सुरू झाल्यानंतर अनोळखी नंबरवरचे कॉलही खऱया नावाने दिसतील.