माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबाबत राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुखर्जी यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या राजकारणावर अंगभूत बुद्धिमत्ता, कार्यकुशलता, संघटन कौशल्य, प्रशासकीय व सांसदीय कार्य अनुभव आणि राजनैतिक द्रष्टेपणाची अमिट छाप सोडणाऱ्या निवडक राजकारण्यांमध्ये प्रणब मुखर्जी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे.

गेल्या पाच दशकांमध्ये प्रणब मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, सभागृह नेते आणि राष्ट्रपती यासह विविध जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडत त्या त्या पदांची ऊंची वाढविली. चार दशके सातत्याने संसदेचे सदस्य असलेल्या मुखर्जी यांनी देशातील सांसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी असाधारण योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे देशाने सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह गमावले आहे. या थोर सुपुत्राला मी आपली श्रद्धांजली वाहतो तसेच आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, असे उपमुख्यमंत्रई अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान्, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचे निधन ही देशाची, राजकारणाची मोठी हानी आहे. देशाचे अर्थमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली होती. महत्वाच्या मुद्यांवर देशातील राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय साधून प्रश्न सोडवण्याचे कौशल्य प्रणवदांकडे होतं. त्यांचे निधन ही देशाची, महाराष्ट्राची, माझी व्यक्तिगत हानी आहे. देशाच्या या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.