सामना ऑनलाईन । मुंबई
देशात मोठय़ा प्रमाणात बोगस बातम्यांचा सुळसुळाट झाला आहे. या बोगस बातम्यांच्या प्रसारणास आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, असे आदेश केंद्र सरकारने व्हॉटस्अॅपला दिले आहेत, अशी माहिती आज लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी एका लेखी उत्तरात दिली. यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाने व्हॉटस्अॅपला नोटीस पाठवलेली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
चुकीची माहिती पसरवणाऱयांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश व्हॉटस्अॅपला दिलेले आहेत, असे अहिर यांनी सांगितले. व्हॉटस्अॅप प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यावरून बोगस बातम्या, चुकीची माहिती पसरवली जात आहे. या वृत्ताची केंद्र सरकारने दखल घेतल्याचे अहिर यांनी सांगितले. बोगस बातम्यांना आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत, अशी माहिती व्हॉटस्अॅपने सरकारला कळविलेली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.


























































