
महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या ‘निर्भया’ पथकासाठीच्या निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर राज्यातील विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिकेची झोड उठवली होती. यामुळे सरकार चांगलेच अडचणीत आले. आता ही वाहनं पुन्हा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
सोमवारी काही गाड्या मुंबई बाहेरून शहरात दाखल झाल्या होत्या. या गाड्या मुंबई पोलिसांच्या मोटर ट्रान्सपोर्ट युनिटच्या गॅरेजमध्ये उभ्या होत्या. सोमवारी रात्रीपर्यंत ही वाहने स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये पाठवण्यात आली. शिवाजी नगर, घाटकोपर आणि मुलुंड स्थानकात वाहने परत करण्यात आली.
शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षा ताफ्यात दिलेली वाहने ज्या पोलीस ठाण्यांमधून नेण्यात आली होती तिथे परत केली जातील. काही दिवसात गाड्या परत पाठवण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे टाइम्स समूहाच्या वृत्तसंकेत स्थळाने म्हटले आहे.
























































