लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, जालना

जालना तालुक्यातील मौजे बाजी उम्रद येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मंजुषा जगधन व खाजगी इसम कांता टोपे यांना 12 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही ग्रामसेविकेच्या रामनगर येथील पोलीस कॉलनी, जालना येथे करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या जालना तालुक्यातील मौजे बाजीउम्रद येथे 1920 चौरस फुटाच्या लहान जागेचा नोटरी बॉन्ड रजिस्टरीद्वारे खरेदी केली होती. सदर जागा तक्रारदार यांच्या नावे करण्यासाठी व जागेची ग्रामपंचायतला नोंद घेवून तसा नमुना नंबर 8 चा उतारा देण्यासाठी तक्रारदार यांनी त्यांच्या गावाच्या ग्रामसेविका मंजुषा जगधने यांच्याकडे सर्व कागदपत्रे देवून त्यांना नमुना नंबर 8 मध्ये नोंद घेण्यासाठी विचारणा केली असता त्यावेळी ग्रामसेविका जगधने यांनी नमुना नंबर आठ मध्ये नोंद घेण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

त्याशिवाय तुमचे काम होणार नाही. त्यावेळी तक्रारदार हे म्हणाले की, पैशाची जमावा-जमाव करून येतो असे म्हणून तक्रारदार हे तेथून निघून आले. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जावून तक्रार दिली. त्यावरून तक्रारदार हे ग्रामसेविका जगधाने यांची राहत्या घरी रामनगर येथील पोलीस कॉलनी येथे पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता ग्रामसेविका जगधने व खाजगी इसम कांता टोपे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मौजे बाजीउम्रद येथील सहान जागेची नोंद ग्रामपंचायतचे नमुना नंबर आठमध्ये घेण्यासाठी पंचासमक्ष तडजोडअंती 12 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आज 28 मे रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आ.वि. काशिद, व्ही.एल. चव्हाण, संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत यांनी पार पाडली.