धुळे, नंदुरबार, नगर, नाशिकसह राज्यातील 264 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 24 फेब्रुवारीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

सामना प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील 264 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या 24 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. 25 फेब्रुवारीला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होतील. निवडणूक आयोगाने याची घोषणा केली असून आजपासूनच या भागात आचारसंहिता लागू झाली आहे. मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱया तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया संगणकाद्वारे राबविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

रायगड जिह्यातील 90 ग्रामपंचायती, रत्नागिरीमधील 40, सिंधुदुर्गमधील 1 अशा कोकण विभागातील 131 ग्रामपंचायती, धुळे- 17, नगर- 36 आणि नंदुरबारमधील 3 अशा नाशिक विभागातील एकूण 56 ग्रामपंचायती, पुणे- 22, सोलापूर-5, सातारा-40 आणि कोल्हापूरमधील 5 अशा पुणे विभागातील एकूण 72 ग्रामपंचायती, संभाजीनगर विभागांतर्गत धाराशीवमधील जिह्यातील 2 ग्रामपंचायती, अमरावती जिल्हा व विभागातील 2 ग्रामपंचायती तर नागपूर विभागांतर्गत गडचिरोली जिह्यातील 1 ग्रामपंचायतीचा या निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे.

उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यासह निवडणूक लढविणाऱया उमेदवारांची अंतिम यादी 13 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मात्र गडचिरोली जिह्यातील ग्रामपंचायतीचे मतदान सकाळी 7.30 पासून ते 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.