शंभराव्या वाढदिवशी आजोबांनी बांधली लग्नगाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. त्यात तो शंभरावा वाढदिवस असेल तर बात काही औरच. आपल्या शंभराव्या वाढदिवसाचे हटके सेलिब्रेशन करण्यासाठी पश्चिम बंगालमधील विश्वनाथ सरकार या आजोबांनी आपल्या 90 वर्षीय पत्नी सुरोधोनी सरकार यांच्यासोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा हटके विवाह सोहळा सध्या गावकऱयांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

मुर्शिदाबाद जिह्यात राहणाऱया विश्वनाथ आणि सुरोधोनी यांच्या लग्नाचा सत्तरावा तसेच विश्वनाथ यांचा शंभरावा वाढदिवस असा दुहेरी योग जुळून आल्याने या दिवसाचे सेलिब्रेशन हटके पद्धतीने करावे असा विचार त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात आला. त्यांचे पुन्हा एकदा थाटामाटात लग्न लावून देण्याचे कुटुंबियांनी ठरवले. त्यानुसार मुले, सूना, नातू-पणतू असे सगळेच तयारीला लागले. नातेवाईक आणि गावकऱयांना निमंत्रणे धाडली. रितीरिवाजानुसार बुधवारी हा विवाह सोहळा पार पडला. हा अनोखा विवाह सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी गावकरीदेखील आवर्जून उपस्थित होते.

विश्वनाथ यांच्या नातवाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही रितीरिवाजानुसार आजी-आजोबांचे पुन्हा एकदा लग्न लावले. लग्नापूर्वी आजोबांना गावातील घरी ठेवण्यात आले तर आजीला लग्नाच्या दोन दिवस आधी शेजारच्या गावातील घरी ठेवले. आजीला नटवण्यासाठी ब्युटिशियनला बोलावले होते तर आजोबा घोडीवर स्वार होऊन लग्नसोहळय़ात पोहोचले.