शहरी वर्गाला पुस्तकांशी जोडणारा ग्रंथोत्सव उपक्रम कौतुकास्पद – डॉ. सहस्त्रबुद्धे

12

सामना प्रतिनिधी । नगर

वाचनापासून दूर चाललेल्या शहरी वर्गाला पुस्तकांशी जोडण्याचे काम ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमातून होत आहे. त्यामुळे राज्य शासनाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले.

राज्य शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या अहमदनगर ग्रंथोत्सव- 2018 चे उदघाटन डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे होते. तत्पूर्वी, ग्रंथोत्सवानिमित्त पुस्तक प्रदर्शन स्टॉल्सचे उदघाटन श्री. द्विवेदी यांच्या हस्ते झाले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, हिंद सेवा मंडळाचे सचिव सुनील रामदासी, नाशिक विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक स.रं. जोपुळे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.मा. गाडेकर आदींची उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, नगर जिल्ह्याला मोठा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा आहे. मायंभटांनी लिहिलेले लीळाचरित्र तसेच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेला नेवासा परिसर असा अभिमानास्पद वारसा आपल्याला आहे. ग्रामीण भागात वाचनाची भूक वाढत असून साहित्याप्रती त्यांची रुची वाढत आहे. त्यादृष्टीने साहित्यिक कार्यक्रमांची संख्याही ग्रामीण भागात वाढती आहे. मात्र, शहरी भागातील वाचनसंस्कृती टिकवणे आणि ती वाढवणे अत्यावश्यक आहे. वाचनापासून दूर जाऊ पाहणाऱ्या शहरी पिढीला वाचनाशी जुळवून घेण्यासाठी अशाप्रकारचे ग्रंथोत्सवासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी, चांगल्या पुस्तकांचे वाचन हे जीवनाच्या वाटचालीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक महापुरुषांची जडणघडण ही चांगल्या पुस्तकांनी केली आहे. त्या महापुरुषांचे विचार समजून घेण्यासाठी आताच्या काळातही त्यांची चरित्रे वाचली गेली पाहिजेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री असोत की अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची वाचनाची आवड सर्वश्रृत आहे. प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

रामदासी यांनी ग्रंथोत्सवाला शुभेच्छा दिल्या. सहायक ग्रंथालय संचालक जोपुळे यांनी राज्यात सर्वप्रथम ग्रंथोत्सव आयोजनाचा मान अहमदनगर जिल्ह्याने मिळवल्याचे सांगितले. प्रास्ताविकात गाडेकर यांनी ग्रंथोत्सव आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. दोन दिवस हा ग्रंथोत्सव सुरु राहणार असून यानिमित्त मांडलेल्या ग्रंथप्रदर्शन स्टॉल्सना साहित्यरसिकांनी भेट द्यावी आणि अधिकाधिक पुस्तके खरेदी करावीत, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या हस्ते यावेळी ग्रंथवाचक गौरव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाशक प्रतिनिधी प्रा. गणेश भगत यांनी केले.

तत्पूर्वी, हुतात्मा स्मारक येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. हुतात्मा स्मारकास अभिवादन करुन आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन आणि संविधानाच्या प्रतीचे पूजन करुन ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी या दिंडीत सहभागी झाले होते. हुतात्मा स्मारक येथून पेमराज सारडा महाविद्यालय अशी ही ग्रंथदिंडी काढण्यात आली.

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनात संभाजीनगर, पुणे, श्रीरामपूर यासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या प्रकाशकांनी त्यांचे स्टॉल्स लावले आहेत. शासकीय ग्रंथागार पुणे यांचा शासकीय प्रकाशनांचा स्टॉलही येथे असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची प्रकाशने असणाऱ्या लोकराज्य, महाराष्ट्र वार्षिकी, महामानव आदी प्रकाशनांचा जिल्हा माहिती कार्यालयाचा स्टॉलही येथे लावण्यात आला आहे. या ग्रंथप्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील वाचनालयांचे प्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या